पालकमंत्री संजय राठोड यांनी हेलिपॅडवर केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाची केली पाहणी
पालकमंत्री संजय राठोड यांनी हेलिपॅडवर केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाची केली पाहणी
वाशिम दि.14(जिमाका) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता आगमन प्रसंगी वसंतनगर येथील हेलिपॅडवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी,अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पोहरादेवी येथे आगमनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराजांची सदिच्छा भेट घेतली.
पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना दिली.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी देखील सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधी स्थळाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून संबंधित अभियंत्याकडून माहिती जाणून घेतली.
Comments
Post a Comment