यंत्रणांनी निधीची मागणी वेळेत करुन जिल्हयाच्या विकासाला गती द्यावी पालकमंत्री संजय राठोड वार्षिक योजनेच्या मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा



यंत्रणांनी निधीची मागणी वेळेत करुन

जिल्हयाच्या विकासाला गती द्यावी

   पालकमंत्री संजय राठोड

वार्षिक योजनेच्या मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा

       वाशिम, दि. 20 (जिमाका)  जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून विविध विकास कामे करतांना नागरीकांना सुविधा निर्माण करुन देण्यात येतात. विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना निर्धारीत वेळेत लाभ देण्यासाठी यंत्रणांनी निधीची मागणी करुन निधी निर्धारीत वेळेत खर्च करुन जिल्हयाच्या विकासाला गती दयावी. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

          आज 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात यंत्रणांचे प्राप्त प्रस्ताव, घेण्यात येणारी कामे, आयपास प्रणालीवर प्रस्तावित कामे व मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा  परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, उपजिल्हाधिकारी श्री. जोशी व नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, जिल्हयात विकास कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून यंत्रणांनी कामांचे नियोजन करावे. जिल्हयात दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावे. दुधाळ जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातून चांगली सेवा उपलब्ध झाली पाहिजे. ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती जीर्ण झाल्या आहे, त्या ठिकाणी इमारत बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात यावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पशुपालकांना या दवाखान्यातून चांगली पशुवैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. पशुसंवर्धन विभागाने तालुका व जिल्हा पातळीवर पशु प्रदर्शन आयोजित करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.

            जिल्हयात मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे असे सांगून श्री. राठोड पुढे म्हणाले, जिल्हयात मत्स्यबीज निर्मिती केंद्र उभारण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हयात तलावातून मासेमारी करणारे पारंपारीक मासेमार व शेततळयातून मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हयातच मत्स्यबीज या केंद्रातून उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे या व्यवसायातून आर्थिक स्थिती सुधाण्यास मदत होणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी हे रेशीम शेतीकडे वळले पाहिजे यासाठी रेशीम विभागाने त्यांना रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बालकांसाठी जिल्हयातील सर्व अंगणवाडयाच्या इमारती चांगल्या स्थितीत असल्या पाहिजे. ज्या इमारतींची बांधकामे करण्याची आवश्यकता आहे त्या बांधकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरीकांना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या आरोग्य संस्थांच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्यासाठी लागणाऱ्या साहित्य व उपकरणांची खरेदी करण्यासाठी निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते यावेळी म्हणाले.

श्रीमती आंबरे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा सप्टेंबर 2023 अखेरचा गोषवारा यावेळी सादर केला. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 311 कोटी 64 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर आहे. 196 कोटी 30 लक्ष रुपये प्राप्त आहे. त्यापैकी 4 कोटी 22 लक्ष रुपयांच्या सर्वसाधारण योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यंत्रणांना 9 कोटी 27 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला असून 6 कोटी 53 लक्ष रुपये यंत्रणांचा खर्च झाला आहे. सर्वसाधारण योजनेसाठी 235 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 66 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेसाठी 10 कोटी रुपये असा एकूण 311 कोटी 64 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर असल्याची माहिती श्रीमती आंबरे यांनी यावेळी दिली.

सभेला अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. श्याम गोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुहास कोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा खनीकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खांबायत, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, मत्स्य व्यवसाय विभागचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी व सुभाष आकोसकर, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे