उमरी- पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी पालकमंत्री संजय राठोड जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीची सभा

उमरी- पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी
                 पालकमंत्री संजय राठोड 

जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीची सभा 

वाशिम दि.21 (जिमाका) देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येत असलेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी.अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 20 ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. 
        सभेला खासदार भावना गवळी, आमदार ऍड.किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे,कार्यकारी अभियंता सुभाष राऊत,नीता बोकडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.व्ही.शिंदे,कार्यकारी अभियंता जी.एस.चव्हाण,कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले,पोहरादेवी व उमरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामांचे अंतिम नकाशे आठ दिवसाच्या आत उपलब्ध करून द्यावे.नंगारा भवनच्या सर्व मजल्यावर आणि बाहेरच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. यापुढे या ठिकाणी अति महत्त्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी येणार असल्यामुळे उमरी परिसरात कायमस्वरूपी दोन हेलिपॅडची उभारणी करावी. सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराच्या परकोटाची डिझाईन तयार करून ती सादर करावी.त्याला मान्यता घेतल्यानंतर ही कामे सुरू करावी. 22 डिसेंबरपर्यंत संत सेवालाल महाराज समाधी मंदिर आणि नंगारा वास्तु संग्रहालय भवनातील कामे पूर्ण करण्यात यावी असे ते यावेळी म्हणाले.
               खासदार गवळी म्हणाल्या, पोरादेवी व उमरी या तीर्थक्षेत्राची विकासकामे झाल्यानंतर देशातील विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे पोहरादेवी व उमरीकडे येणारी चारही बाजूंचे रस्ते तयार करण्यात यावे. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याचा त्रास होणार नाही असे त्या म्हणाल्या.
               आमदार पाटणी म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येणारी कामे ही सुसंगत असावी. नंगारा वस्तुसंग्रहालयाची रंगरंगोटी करण्याकडे दुर्लक्ष होऊ नये. योग्य रंगाची निवड करावी,असे त्यांनी सांगितले.
                 जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, या तीर्थस्थळी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोणत्याही आपत्तीचा सामना करण्याची वेळ येणार नाही याबाबतच्या उपाययोजना कराव्यात. या तीर्थक्षेत्रामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.जिल्ह्यातून जवळपास 100 किमी समृद्धी महामार्ग गेला असल्यामुळे या महामार्गाचा फायदा देखील भाविकांना पोहरादेवीला येण्यासाठी होणार असल्याचे त्या म्हणाल्या.    
                    पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र समितीच्या या सभेत पोहरादेवी -उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखडयातील सुधारित कामांना मान्यता देण्यात आली.संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडापूर्वी 167 कोटी 9 लक्ष रुपयांचा होता.त्यामध्ये आता 230 कोटी 65 लक्ष रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता हा आराखडा 397 कोटी 74 लक्ष रुपयांचा प्रस्तावित करण्यात आला आहे.
                 समितीच्या सभेत संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत बाबीच्या बदलास मान्यता देण्यात आली.तसेच 326 कोटी रुपयांच्या उमरी - पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील अंतर्गत बाबीच्या बदलास देखील मान्यता देण्यात आली.सभेला संबंधित विभागाचे अधिकारी व वास्तुविशारद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे