आपत्ती काळात गरजूंना तात्काळ मदत करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम



आपत्ती काळात गरजूंना तात्काळ मदत करा

                                                                   जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

       वाशिम, दि. 05 (जिमाका) तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. शाळा आणि कॉलेजमधून चांगले संस्कार केले जातात. रस्त्यात अपघात झाल्यावर आपण सेल्फी काढण्याच्या नादात अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करायला विसरतो. त्या व्यक्तीला वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्याला जीव गमवावा लागतो. म्हणजेच मोबाईलमुळे आपणाला चांगले कार्य करण्याचे विसर पडत आहे. आपल्या अंगी असणाऱ्या गुणामुळेच आपली ओळख निर्माण होते. अपघात व आपत्तीच्या काळात आपणाला मदत कसे करता येईल. याबाबतची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ती माहिती आपण सर्वांनी आत्मसात करुन अपघातग्रस्त व आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करावी. असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले.

           आज 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालयाच्या डागा सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमावेळी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिलाबाई राठी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सचिव सुधीर राठी, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश झवर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, उपप्राचार्य श्री. हेमंत वंजारी व प्रा.डॉ.शैलेश सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, सद्यस्थितीत मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मोठया प्रमाणात स्पर्धा सुरु आहे. हे वय अभ्यास करण्याचे आहे. दिवसेंदिवस शासकीय नोकरीची परिस्थिती बिकट होत चालली आहे. एका पदाच्या जागेसाठी लाखो अर्ज प्राप्त होतात. या प्राप्त अर्जातून निवड होण्यासाठी आपणाला खुप मेहनत करावी लागेल. मी तुमच्या वयात असतांना जर मोबाईलमध्ये जास्तवेळ घालविला असता तर आज मी या पदापर्यंत पोहचू शकले नसते. त्यामुळे अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासामुळेच माणासाची दिशा व दशा बदलू शकते. तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोबाईलव्दारे सेल्फी न काढता आपत्तीत सापडलेल्या व्यक्तीला आवश्यक मदत करावी. असे त्या यावेळी म्हणाल्या.

           श्रीमती राठी म्हणाल्या, शिक्षणासोबतच काळानुरुप इतर प्रशिक्षण व माहिती असणे आवश्यक आहे. आपत्तीच्या काळात आपघातग्रस्तांना मदत कशी करावी. हे पण आपणाला माहित असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्तीमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. आपत्तीच्या वेळी आपण कोणाला तरी कामी आले पाहिजे. आपत्ती कशी येते हे आपल्याला माहित नसते. पण आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असले पाहिजे. त्यासाठीच या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्तीच्यावेळी अपघातग्रस्तांना मदत कशी करावी. याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. ती माहिती आपण सर्वांनी आत्मसात करुन आपणही इतरांना मदत करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           प्रास्ताविकातून डॉ. झवर म्हणाले, सद्यस्थितीत नाही ती आपत्ती येत आहे. या आपत्तीत एकमेकांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबतची माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणेच्या वतीने प्रात्याक्षिकेतून आपत्तीच्या वेळी माणसांना कसे वाचविता येईल याबाबतची माहिती देण्यात येत आहे. शिक्षणासोबतच समाजाची सेवा करणे हे पण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

          श्री. यादव म्हणाले, आग, पूर, किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात आपण जे काही शिकाल त्याचा वापर अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी करा.जेणेकरुन त्या व्यक्तीचे जीव वाचेल.

           कार्यक्रमाला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जैनुद्दीन शेख, विनोद गावंडे, हेड कॉन्सटेबल दिलीप राऊत, कॉन्सटेबल नारायण शिरसाठ, विनोद डोके, परशुराम साहू, डॉ.अनिल बनसोड, प्रा.स्वप्नील काळबांडे, शिक्षक अमोल काळे, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व इतर विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

          प्रास्ताविक प्राचार्य डॉ. झवर यांनी केले. संचालन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. सोनुने यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे