आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे * तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी * जिल्हा रुग्णालयात दररोज 1500 रुग्ण घेत आहे आरोग्य सेवेचा लाभ* सप्टेंबर महिन्यात 199 रुग्णांचे डायलिसिस * नवजात शिशु उपचार कक्षात 119 बालकांवर उपचार * सर्व तपासण्या 24 तास सुरू * अपघात विभाग 24 तास कार्यरत

आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा 
    जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे 

* तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी 

* जिल्हा रुग्णालयात दररोज 1500 रुग्ण घेत आहे आरोग्य सेवेचा लाभ

* सप्टेंबर महिन्यात 199 रुग्णांचे डायलिसिस 

* नवजात शिशु उपचार कक्षात 119 बालकांवर उपचार 

* सर्व तपासण्या 24 तास सुरू 

* अपघात विभाग 24 तास कार्यरत 

वाशिम दि.7 (जिमाका) वाशीम येथील जिल्हा रुग्णालय 24 तास सुरू असून नागरिकांनी येथे उपलब्ध असलेल्या विविध आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले आहे.
            बाह्यरुग्ण विभागाअंतर्गत सर्व विभागाच्या तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येते. जिल्हा रुग्णालयात दररोज 1200 ते 1500 रूग्ण विविध आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेत आहे.मधुमेह, रक्तदाब व वृद्धपणातल्या आजारांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष व सर्व प्रकारच्या रुग्णाला लागणारी 1 महिन्याची औषधी प्रत्येक महिन्याला रुग्णाला देण्यात येते. नेत्र विभागातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात. दंतरोग विभागांमध्ये कॅन्सरची तपासणी व दातांसंबंधी मोफत उपचार केले जातात.जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र फिजिओथेरपी विभाग आहे.
        सर्वसामान्यांना व गरीब रुग्णांना न परवडणारे महागडे औषधी व उपचार जसे की हिमोफिलियासाठी फॅक्टर 8 कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे इन्यूनोग्लोबुलीन उपलब्ध आहे. सिकलसेल व थँलिसीमिया या रुग्णांसाठी सुसज्ज व वातानुकूलित पेशंट फ्रेंडली रक्त संक्रमण कक्ष कार्यरत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात 24 तास सुरक्षित प्रसुती व सिझेरियन करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. सप्टेंबर महिन्यात 550 प्रसूती व 116 सिजेरियन प्रसूती झाल्या.वातानुकूलित सुसज्ज 10 बेडच्या डायलिसिस विभागात नॅपरॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली 199 रुग्णांचे माहे सप्टेंबरमध्ये डायलिसिस करण्यात आले.
               नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सुसज्ज नवजात शिशु उपचार कक्षामध्ये माहे सप्टेंबरमध्ये 119 बालकांवर उपचार करण्यात आले. दिव्यांग व जन्मजात व्याधी असलेल्या बालकांमध्ये सुधारणा करण्यासाठी डी.इ.आय.सी विभाग कार्यरत आहे.आठवड्यातून दोनदा दिव्यांगांची तपासणी करण्यात येते.रुग्णालय परिसरात सुलभ शौचालयाची व्यवस्था देखील आहे. 
               प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिलांची स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते. आवश्यक उपचार व तपासण्या केल्या जातात. त्यातून अति जोखमीच्या मातांचे निदान करून त्यांना योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा दिली जाते.    
             शालेय आरोग्य तपासणी आरबीएसके अंतर्गत अंगणवाडी व शाळा तपासणी करून कमी वजनाच्या बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात भरती केले जाते.डोळ्यांची व हृदयांची शस्त्रक्रिया ज्या बालकांच्या करणे आवश्यक आहे, त्या बालकांना शस्त्रक्रियेसाठी अंगीकृत रुग्णालय मुंबई, हैदराबाद व अमरावती येथे येण्याजाण्याची मोफत व्यवस्था करून शस्त्रक्रिया केल्या जातात.माहे एप्रिल 2023 पासून 22 हृदयरोग शस्त्रक्रिया व 90 इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
               आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व शनिवार लसीकरणाच्या दिवशी सर्व लसी ह्या मोफत व प्रशिक्षित व्यक्तींकडून देण्यात येतात. रुग्णालयामध्ये सर्व तपासण्या 24 तास केल्या जातात. रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे व सिटीस्कॅन देखील करण्यात येतात.अपघात विभाग हा 24 तास कार्यरत आहे. सुसज्ज अति दक्षता विभाग नवजात बालकांसाठी एस.एन.सी.यु, डायलिसिस विभाग, पोषण पुनर्वसन केंद्र व डी.आय.सी कार्यरत आहे. गर्भाशयाच्या मुखाची तपासणी करून कर्करोगाचे निदान करण्यात येते.   
           आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व औषधी साठा उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रमधून उपचारासाठी रुग्ण या मेळाव्यात पाठविण्यात येतात.आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करावयाच्या असल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे