जागतिक महिला दिनानिमित्तकारंजा येथे माविमच्या महिलांचा मेळावा संपन्न



जागतिक महिला दिनानिमित्त

कारंजा येथे माविमच्या महिलांचा मेळावा संपन्न

            वाशिम, दि. 09 (जिमाका) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्र, कारंजा अंतर्गत कारंजा शहरातील बचतगटातील महिलांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्याचे उदघाटन तहसिलदार धीरज मांजरे यांनी केले.  अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे हे होते. प्रमुख पाहुणे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक पंकज तायडे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अविनाश सरकते, आयसीआयसीचे बँकेचे अमरावती विभागाचे व्यवस्थापन अधिकारी सचिन तायडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक प्रांजली वसाके, कार्यक्रम अधिकारी संघरत्न नरवाडे व शहर अभियान व्यवस्थापक छाया मोटघरे यांची उपस्थिती होती.

              यशस्वी उद्योजक बचतगटांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये तेजस्वीनी आटा निर्मिती केंद्र, जैन कॅटरिंग, अन्नपूर्णा गृह उद्योग या बचत गटांद्वारे संचालित उद्योगिक बचतगटांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी अॅड. श्रुता गडेकर यांना अरिहंत टेक्निकल इंस्टीट्युट वाशीमच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार निर्मिती केल्याबाबत व आपल्या वकिली व्यवसायाव्दारे सामाजिक बांधिलकीतून समाजाला नवी दिशा देवून आत्मनिर्भर केल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.  महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत बचतगटांना अर्थपुरवठा करणाऱ्या बँक पार्टनर यांचे सहकार्याबाबत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया कारंजा, व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. 

            तहसिलदार श्री. मांजरे यांनी मार्गदर्शनातून बचतगटाची ही चळवळ आता घरोघरी पोहचली असून खऱ्या अर्थाने बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमपणे विविध क्षेत्रामध्ये वाटचाल करीत आहे. आज ग्रामीण अशिक्षित महिला ही सुध्दा धैर्याने बँकेचे व्यवहार करीत आहे. पुरुषाच्या तुलनेने महिला  कर्ज घेवून १०० टक्के परतफेड करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी महिलांनी आता स्वयंरोजगार निर्माण करून  उद्योजक व्हावे यामधून आत्मनिर्भर महिला ही ओळख आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त अधिक गौरवशाली वाटेल असे त्यांनी सांगीतले. 

               श्री. नागपुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्रअंतर्गत ५५३ महिला बचत गट व ५६०० महिलांचे नेतृत्व करणारी संस्था आहे. विविध योजनांच्या माध्यामातून विकासाच्या योजना महिलांपर्यंत पोहचवीत आहे. अनेक महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहे. रुरल मार्टच्या माध्यमातून दालन उपलब्ध आहे. तरी जास्तीत महिलांनी आपली उत्पादने व्यावसायिक पद्धतीने निर्माण करून विक्री करावी. याकरिता प्रशासन व महिला आर्थिक विकास महामंडळ सोबत आहे असे आश्वासन त्यांनी दिले.

              महिला मेळाव्यात महिलांच्या कलागुणांना वाव देवून सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे व्यवस्थापक विजय वाहने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अल्पसंख्यांक लोक संचालित साधन केंद्राचे लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक, कार्यकारिणी समिती, सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे