कारागृहातील बंदयांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
- Get link
- X
- Other Apps
कारागृहातील बंदयांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
वाशिम, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिम यांच्यावतीने वाशिम कारागृहातील बंदयांना आयोजित कौशल्य विकासाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप आज 29 मार्च रोजी जिल्हा कारागृह येथे झाला.
कारागृहातील बंदयांना आयोजित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना कुशलयुक्त बनवावे हा विचार स्थानिक प्रशासनाच्या मनात आला व त्यादृष्टीने प्रयत्न करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिम यांच्यावतीने जिल्हा कारागृहातील ९५ बंदयांना कॅटरिंग, बेकरी प्रोडक्ट, व बंदिस्त शेळीपालन या तीन क्षेत्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हे बंदी कारागृहातून मुक्त होतील तेंव्हा या प्रशिक्षणामुळे त्यांचे जीवनमान बदलण्यास मदत होईल. हे बंदी रोजगारक्षम होवून आपले जीवन स्वावलंबनाने व सन्मानाने जगतील. या उदात्त हेतूने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बंदयांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती महक स्वामी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्ना रत्नपारखी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. बंदयांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक शिवाजी आमटे व ट्विंकल अंभोरे यांचेही मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले. उपस्थित बंदयांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती बजाज यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व बंदयांना चांगले जीवन जगण्यास मार्गदर्शन केले. तसेच काही बंदी बांधवांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार श्री. राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना
साठी कारागृह अधिकारी/कर्मचारी वर्ग व कौशल्य विकास विभागाचे गोपाल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रशिक्षण वर्गाला कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते.*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment