जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत रोअर्स मशीनच्या सहाय्याने जमीनीची मोजणी


जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत
रोअर्स मशीनच्या सहाय्याने जमीनीची मोजणी

वाशिम दि.०८ (जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुराजन एस यांनी आज ८ मार्च रोजी वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथे भूमिअभिलेख विभागाकडून रोअर्स मशीन या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या शासकीय जमीन मोजणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक श्री.भोसले,केंद्रीय विद्यालय,वाशिमचे प्राचार्य ए.एच. खान,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री वैद्य,कार्यकारी अभियंता श्री तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.
        रोअर्स मशीनने केवळ एका तासात २० हेक्‍टर जमिनीची मोजणी करता येते.ही मोजणी अचूक आणि पारदर्शकपणे रोअर्स मशिनच्या साह्याने करण्यात येत असल्याची माहिती श्री.भोसले यांनी यावेळी दिली.
       केवळ पाच सेकंदात ही मशीन रिडींग घेते. मशीनमध्ये खऱ्या अक्षांश आणि रेखांशला मोजणी करण्यात येते.ब्लूटूथने कनेक्ट होते.जमीन मोजणी प्रकरणे निकाली करण्याची प्रचंड क्षमता या मशीनमध्ये आहे. वाशिम जिल्हा प्लेन टेबल फ्री जिल्हा आहे. जिल्ह्यात केवळ ईटीएस मशिनच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्यात येते.जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागात ४० टक्के रिक्त पदामुळे जमीन मोजणीला विलंब लागत होता.आता रोअर्स मशिन्स उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील २ हजार जमिन मोजणीची प्रलंबित प्रकरणे चार महिन्यात निकाली काढता येणार असल्याची माहिती श्री भोसले यांनी यावेळी दिली.
      जिल्ह्यात रोवर्स मशीनने मोजणी करण्यासाठी रिसोड आणि मानोरा येथे कॉअर्स स्टेशन कार्यान्वित झाले आहे. हे कॉअर्स स्टेशन २४ तास उपग्रहाशी जोडले आहे. या स्टेशनची क्षमता ७० किलोमीटर परिघातील क्षेत्राची आहे. याच जमीन मोजणीला प्लेन टेबल मोजणीने बारा तासाचा कालावधी,
ई.टी.एस मशिनने सहा तास तर रोअर्स मशीनने केवळ एका तासात मोजणी करण्यात येते.ई टी.एस. मशीनपेक्षा पाच पट अधिक गतीने काम करण्याची क्षमता रोअर्स मशीनमध्ये असल्याची माहिती श्री.भोसले यांनी दिली.
       जिल्ह्यासाठी १० रोअर्स मशिन्स जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील १ कोटी रुपयातून उपलब्ध करून दिल्या आहे.आज आणखी २ रोअर्स मशिन्स जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे