महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीचा प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला लेखाजोखा;**मंत्रालयातील चित्रमय प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक

*महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीचा प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला लेखाजोखा;*
*मंत्रालयातील चित्रमय प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक*

            मुंबई, दि. 11 : कोविडसारख्या जागतिक संकटाच्या काळातही महाराष्ट्र थांबला नाही. राज्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. याचाच लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रदर्शनास भेट देऊन या संकल्पनेचे कौतुक केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहीत पवार आदींनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या प्रदर्शनास भेट दिली. प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर यांनी त्यांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली. यावेळी माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक गणेश रामदासी, दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.

*सर्व विषय हाताळल्याबद्दल कौतुक*

            दोन वर्षांचा काळ अतिशय कठीण होता. या काळात कोविडपासून नागरिकांचे संरक्षण करण्यास शासनाला प्राधान्य द्यावे लागले. या परिस्थितीत देखील विविध विभागांच्या सकारात्मक योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र थांबला नाही. अशा प्रत्येक विभागाविषयीच्या निर्णयांचा समावेश करून माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले.

            राज्यमंत्री शंभुराज देसाई तसेच संजय बनसोडे यांनी देखील या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणी देखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

            मागील दोन वर्षातील कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, शालेय शिक्षण आदी विभागांची कामगिरी मोलाची राहिली आहे. यांसह सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृहनिर्माण, वस्त्रोद्योग, महसूल, वन, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा, गृह, पर्यटन, पर्यावरण, कौशल्य विकास, मराठी भाषा आदी विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अभ्यागतांसाठी अधिवेशन कालावधीपर्यंत खुले असणार आहे.

*फिरत्या ३६० डिग्री सेल्फी पॉईंटचे आकर्षण*

            चिरेबंदी किल्ल्याच्या उंच भिंतीची उत्तुंगता आणि त्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला आकर्षून घेत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनाही येथे व्हिडीओ सेल्फी काढण्याचा मोह झाला नसता तर नवल. सर्वांनीच मग हातात शासनाच्या प्रसिद्धीचे फलक घेऊन येथे व्हिडीओ सेल्फी काढल्या.

            या प्रदर्शनात काढलेला सेल्फी व्हिडीओ आपल्या समाजमाध्यमावर टाकताना #दोनवर्षजनसेवेचीमहाविकासआघाडीची हा हॅशटॅग वापरावा. तसेच आपला सेल्फी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या @MahaDGIPR या ट्विटर हॅण्डल व फेसबुकला टॅग करावा. इन्स्टाग्रामला सेल्फी पोस्ट केल्यानंतर @mahadgipr या हॅण्डलला टॅग करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे