प्रबोधनातून योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत

प्रबोधनातून योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत 
                               राजेश नागपुरे

 अडोळी येथे कलापथकाकडून समाज कल्याण योजनांची माहिती 

वाशिम दि.०८(जिमाका) शासनाच्या अनेक योजना आहेत.या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व लाभार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात नाही.अशाप्रकारे योजनांवर आधारित कलापथक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे ग्रामस्थांचे मनोरंजन करून प्रबोधनातून योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होते. असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूर यांनी केले. 
                   ८ मार्च रोजी वाशिम तालुक्यातील अडोळी येथील बुद्ध विहार परिसरात जिल्हा माहिती कार्यालय वाशीमच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२१-२२ अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्य अतिथी म्हणून श्री. नागपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर ईढोळे होते. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,प्रतिष्ठित नागरिक राजकुमार पडघान,ग्राम विकास अधिकारी व्ही.के.भगत,ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजू इढोळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अन्नपूर्णा तायडे व कमल पडघान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
               श्री नागपूरे पुढे म्हणाले, नागरिकांना व लाभार्थ्यांना समाज कल्याणच्या विविध योजनाची माहिती व्हावी यासाठी या गावात जिल्हा माहिती कार्यालयाने डिजिटल वॉल पेंटिंगच्या माध्यमातून भिंतीवर योजनांची माहिती दिली आहे. तसेच योजनांवर आधारित घडीपुस्तिकेचे देखील वितरण या कार्यक्रमातून करण्यात आले आहे. मागासवर्गीय महिलांच्या बचतगटांसाठी मिनी ट्रॅक्टरची योजना आहे. गावातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरच्या योजनांची माहिती घेऊन आपल्या उपजीविकेच्या आणखी एक साधन निर्माण करावे.शासनाच्या विविध योजना सर्वांसाठी आहे. लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन योजनांचा लाभ घ्यावा. शासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.बचत गटांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या पाठीशी सदैव उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
         प्रास्ताविकातून श्री.खडसे म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावले पाहिजे. कलापथक हे मनोरंजनाचे एक साधन आहे. मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम कलापथकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करता येते. हा उद्देश ठेवून ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळून भविष्यात ते विविध योजनांचा लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
             रामचंद्र बहुउद्देशीय कला संस्थेचे कलापथक प्रमुख मधुकर गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी कलापथकाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला अडोळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राजकुमार पडघान यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्राम विकास अधिकारी व्ही.के.भगत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे