जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देणार - अशोकराव चव्हाण, रेल्वे उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण
जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देणार
-अशोकराव चव्हाण
रेल्वे उड्डाण
पुलाचे ई-लोकार्पण
वाशिम, दि. 23 (जिमाका) : राज्यातील अविकसीत भागातील
रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. वाशिम हा मागास जिल्हा आहे. जिल्हयाला
विकासाच्या बाबतीत झुकते माप देऊन जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देण्यात येईल.
असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
आज 23 मार्च रोजी वाशिम-पुसद
मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभुराज देसाई होते. खासदार
भावना गवळी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक व आमदार अमित झनक हे ऑनलाईन ई-लोकार्पण
कार्यक्रमात सहभागी झाले. वाशिम येथील उड्डाण पुलाजवळ आयोजित कार्यक्रमाला
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती
सुरेश मापारी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, सहाय्यक
पोलीस अधिक्षक श्रीमती स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता दिनेश
नंदनवार, रेल्वेचे सहाय्यक मुख्य अभियंता श्री. निमजे व सार्वजनिक बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.एन. मिठ्ठेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. चव्हाण म्हणाले, बऱ्याच
दिवसापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले असल्याने आज
त्याचे लोकार्पण होत आहे. वाशिम जिल्हयाच्या विकासाकडे आपले दुर्लक्ष होणार नाही.
जिल्हयाच्या रस्ते विकासासाठी अधिक निधी देण्यात येईल. केंद्रीय भु-पृष्ठ
वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे मदतीसाठी सदैव तत्पर असतात. सार्वजनिक बांधकाम
विभागाने चांगल्या दर्जाची कामे करुन ती वेळेत पुर्ण करावी असे ते म्हणाले.
श्री. देसाई म्हणाले, कोविडमुळे
पुलाचे बांधकाम जवळपास दिड वर्ष रखडले होते. प्रवाशांची आणि नागरीकांची पुलाच्या
कामामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत हे काम झाले पाहिजे यासाठी आपण
बैठकीतून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुचना दिल्या. पुलाचे काम तातडीने
पुर्ण झाले. आज हा उड्डाण पुल वाहतूकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या
समस्या सोडविण्यास मदत झाली आहे. राज्यमार्ग केंद्रियमार्ग निधीतून हा पुल तयार
झाला आहे. त्यासाठी केंद्रिय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व खासदार भावना
गवळी यांचे अभिनंदन करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हयातील रस्त्यांच्या
दूरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी उपलब्ध करुन दयावा. त्यामुळे जिल्हयाच्या
रस्ते दुरुस्तीचा अनुशेष दूर होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगीतले.
खासदार गवळी म्हणाल्या, या उड्डाण
पुलासाठी निधीची उपलब्धता करुन घेणे महत्वाचे होते. रेल्वेच्या उड्डाण पुलाचे
नकाशे तयार करण्याचे काम रेल्वेचा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याने या
रेल्वेच्या उड्डाण पुलाचा नकाशा तयार करण्यास विलंब लागला. वाशिम रेल्वे स्टेशन हे
दक्षिण मध्य रेल्वे विभागात असून त्याचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. तयार
केलेले नकाशे मंजूर करायला विलंब लागला त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला. केंद्रिय
मंत्री नितीन गडकरी हे जेंव्हा वाशिम जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते तेंव्हा
त्यांनी या पुलासाठी केंद्रिय रस्ते निधीतून निधी उपलब्ध करुन देण्याचे कबुल केले
होते. आपण या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करुन आवश्यक त्या पुर्तता करुन
घेतल्या. कोरोनामुळे जवळपास दिड वर्ष पुलाचे बांधकाम रखडले. आज या रेल्वे उड्डाण
पुलाचा लोकार्पण सोहळा होत आहे ही आनंदाची बाब आहे. रेल्वे गेटवर अनेकवेळा
वाहतूकीचा खोळंबा झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. या लोकार्पणामुळे
लोकांचा त्रास कमी होणार आहे. वाशिम हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यामुळे सार्वजनिक
बांधकाम विभागाने जिल्हयातील रस्त्यांच्या सुविधेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध
करुन देऊन जिल्हयाच्या विकासाला झुकते माप दयावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी
व्यक्त केली.
खासदार जाधव म्हणाले,
वाशिमकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. या पुलामुळे सर्व बाजूंच्या वाहनधारकांसाठी
चांगली सुविधा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलाशी
संबंधित कामे त्वरीत पुर्ण केल्याने आज या पुलाचे लोकार्पण होत असल्याचे त्यांनी
सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक
अभियंता श्री. नंदनवार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता व्हि.एन. मिठ्ठेवाड
यांनी मानले. यावेळी नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
वाशिम शहरातील पुसद-वाशिम
मार्गावरील या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी 20 कोटी 50 लक्ष रुपयांची प्रशासकीय
मान्यता मिळाली आहे. या कामावर 18 कोटी 36 लक्ष रुपये खर्च झाला आहे. सन 2021-22
या वर्षात या पुलासाठी 1 कोटी 96 लक्ष रुपयाची तरतुद केली आहे. तर उर्वरीत
कामासाठी 2 कोटी 12 लक्ष रुपये निधी तरतुद केली आहे.
*******
Comments
Post a Comment