लम्पीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी पोळा घरीच साजरा करा ..पशुसंवर्धन विभागाचे आवाहन




लम्पीचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी

पोळा घरीच साजरा करा

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात एकुण १ लक्ष ६८ हजार ९१ गोवर्गीय पशुधनाची संख्या आहे. आजपर्यंत १ लक्ष ६२ हजार ४९४ जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण पुर्ण झाले आहे. तरी देखील जिल्हयात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब विचारात घेता लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी यावर्षी पोळा हा सण सार्वजनीक स्वरुपात साजरा न करता, घरीच साजरा करण्याचे आवाहन सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांना पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

            सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरीत संपर्क साधावा. बाधित जनावरे कळपातील निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. त्यांचे चारा व पाण्याची व्यवस्था वेगळी करण्यात यावी. बाधित जनावरांची वाहतुक करु नये. बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करावे. बाधित व निरोगी जनावरे एकत्रीत चरावयास सोडु नये. मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी. या रोगाचा प्रसार हा मुख्यत्वे बाहय किटकाव्दारे होत असल्याने जनावरांचे गोठे व त्या परिसरात मच्छर, गोचिडे, माश्यांचे निर्मुलन करण्यासाठी किटकनाशक औषधांची फवारणी करावी. जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्याम गोरे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे