शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात सर्वांचे योगदान महत्वपूर्ण जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा विकास आराखडा सभा *यंत्रणांनी केले आराखड्याचे सादरीकरण* *अनेकांनी मांडल्या जिल्ह्याच्या विकासाच्या सूचना*

शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात सर्वांचे योगदान महत्वपूर्ण
                       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 

जिल्हा विकास आराखडा सभा   
 
*यंत्रणांनी केले आराखड्याचे सादरीकरण* 

*अनेकांनी मांडल्या जिल्ह्याच्या विकासाच्या सूचना* 

वाशिम दि.9 (जिमाका) जिल्ह्यातील प्रति व्यक्ती उत्पन्न वाढविण्यासाठी  विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.जिल्ह्याच्या एकंदरीत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात सर्वांचे योगदान महत्वाचे राहणार असल्याचे मत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केले.
                  आज 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा विकास आराखडा कार्यशाळेत त्या बोलत होत्या.सभेला उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, गोखले इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ.प्रशांत बनसोडे,योगेश पायलीमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, विकास आराखड्यातून सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायमच्या थांबतील.जिल्हा विविध क्षेत्रात कायम अग्रेसर राहील.अशी अपेक्षा व्यक्त करून त्या पुढे म्हणाल्या,सर्व अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सअँप ग्रुप  तयार करावा.त्यामध्ये आपल्याला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याबाबतचे नियोजन करावे.जिल्ह्याच्या विकास आराखड्याची ही सुरुवात आहे.ज्या ज्या विभागांनी आपल्या सादरीकरणातून आणि उपस्थित विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या सूचना मांडल्या आहेत,त्या निश्चितच उपयुक्त आहे.जिल्ह्याच्या विकास आराखड्यात या सुचनांचा समावेश करण्यात येईल.या सूचनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.असे त्या म्हणाल्या.  
                 गोखले इन्स्टिट्यूटचे डॉ. बनसोडे,म्हणाले,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारने देशाला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. राज्यांनी सुद्धा 2047 पर्यंत विकसित होणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्ह्यानी  सामूहिक संरचनात्मक  सामाजिक व आर्थिक परिवर्तन करणे अपेक्षित आहे.जागतिक माणके साध्य करण्याची आकांक्षा जिल्हे प्रेरणादायी ठरणार आहे.जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधननामधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्ह्याच्या विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
                 विकास आराखड्याच्या अनुषंगाने कृषी विभागाचे सादरीकरण करतांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.शाह म्हणाले, जिल्ह्याची शेती मुख्यतः खरीप हंगामावर अवलंबून आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होते.सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग उभी राहण्याची गरज आहे.संत्रा क्षेत्र वाढत असताना त्यावर भविष्यात प्रक्रिया उद्योग उभे राहावेत.समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने उत्पादित मालाची थेट निर्यात होणे गरजेचे आहे.कृषी क्षेत्राला पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा उपलब्ध झाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होईल.कौशल्य विकसित मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध झाले पाहिजे. प्रक्रिया प्रकल्प व गोदामाची निर्मिती मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. शेतमाल शेतातून गावापर्यंत आणण्यासाठी अंतर्गत चांगले रस्ते तयार झाले पाहिजे.असे ते म्हणाले.
             यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग,आरोग्य विभाग, सिंचन विभाग,पशुसंवर्धन विभाग आणि रेशीम विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत 2047 पर्यंत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या विकास आराखडयाची माहिती आपल्या सादरीकरणातून दिली.
           यावेळी डॉ.हरीश बाहेती यांनी जिल्हा कुपोषणमुक्त झाला पाहिजे तसेच जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचा मेंदू पण सक्षम असला पाहिजे.जिल्ह्यात गृहरुग्णसेवा ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे.अशी सूचना मांडली.
               सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले म्हणाल्या, जिल्ह्यातील शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती झाली पाहिजे.त्यामुळे महिलांची होणारी कुचंबना थांबेल. जिल्ह्यातील दिव्यांग व अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे.असे सांगितले. 
             श्रीमती दीपा वानखेडे यांनी जिल्ह्यात योगभव,आध्यात्मिक भवन तसेच योग संशोधन केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.श्री गिरीधारीलाल सारडा यांनी जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू होण्याची आवश्यकता विशद केली. 
                 श्री.प्रशांत गडेकर यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यामुळे प्रत्येक तरुण तरुणींना काम मिळावे.शहरातील बगीगाचा विकास झाला पाहिजे.इरफान सय्यद यांनी जिल्ह्यातील उद्योगांना व्यासपीठ मिळाले पाहिजे.  
            सामाजिक कार्यकर्ते पी.एस खंदारे यांनी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा उद्योग क्षेत्राकडे देण्याचा निर्णय मागे घ्यावा.स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला लोकप्रतिनिधीच्या कार्यशाळा घेऊन त्यांना सक्षम करावे.त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही.
              जलचळवळ कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील सोहोळ आणि काटेपूर्णा अभयारण्याचा विकास होणे गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. वनात मोठ्या प्रमाणात वनतळी तयार करावी.त्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी शेताकडे येऊन पिकांचे नुकसान करणार नाही.जिल्ह्यात पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कामरगव व अनसिंग हे दोन तालुके निर्माण झाल्यास नागरिकांची गैरसोय टाळता येईल.असे सांगितले.
                  पंचाळा येथील नारायण विभूते म्हणाले,शेतीच्या उत्पादित माला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी आत्महत्या होणार नाही. शेतीकडे व गावांकडे जाणारे रस्ते चांगले व्हावे.गाव तेथे गोदाम झाले पाहिजे. गावपातळीवर शेतीतील उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग सुरू व्हावे. सेवा सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण व डिजीटलायझेशन झाले पाहिजे अशी सूचना मांडली.
              श्री.सुभाष नानवटे यांनी जिल्ह्यात असलेल्या तलावातील गाळ काढणे, सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती करणे,रिचार्ज पिटची कामे केवळ पाणलोट क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिह्यात करण्यात यावी.त्यामुळे माती वाहून जाणार नाही.भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल व सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
           यावेळी डॉ अर्चना मेहकरकर, श्री.गोविंद,श्री.धोंगडे, विनोद इंगळे, सुदर्शन सरनाईक,मयुरी सावळे,हरीश अवस्थी,माधव बोरकर,वृषाली टेकाडे, चंद्रकांत देशमुख,गजानन धामणे किशोर देशमुख यांनीही जिल्हा विकास आराखड्याच्या दृष्टीने आपल्या सूचना यावेळी मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन अविनाश मारशेटवार यांनी केले.उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांनी केले. 
            या सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे