सर्वांनी मिळून सण - उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करूया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. शांतता समिती सभा


सर्वांनी मिळून सण - उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करूया 
            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
          शांतता समिती सभा 

वाशिम दि 6 (जिमाका) जिल्ह्यात 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत श्री गणेश उत्सव आणि 28 किंवा 29 सप्टेंबर रोजी इद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हिंदू - मुस्लिम बांधव हे सण उत्सव एकमेकांना सहभागी करून साजरे करतात. यावर्षी देखील हे सण उत्सव सर्वांनी मिळून शांततेत आणि आनंदाने साजरे करूया असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
                आज 6 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती क्रीतिका व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
            श्री.बच्चन सिंह म्हणाले,सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी.समाजात विघातक लोकांचे प्रमाण फार कमी आहे.त्यांच्या डोक्यात अस्थिरता निर्माण करणे हाच त्यांचा उद्देश असतो.सर्व गणेश मंडळ व नागरिकांनी पोलिसांना सण उत्सवाच्या काळात सहकार्य करावे. यापूर्वी सुद्धा नागरिकांच्या सहकार्यामुळे शांतता ठेवता आली. सण-उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.समाजात शांतता राहावी हे महत्त्वाचे आहे.समाजात असुरक्षितता नसली पाहिजे.ती विकासाला बाधक आहे.समाजाचा आपण एक घटक आहोत.समाज पुढे गेला पाहिजे यासाठी विधायक कामे करावी.समाज माध्यमातून जे आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात येतात, ते इतरत्र पाठवू नये.आक्षेपार्ह संदेश असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती दयावी म्हणजे संबंधितावर कारवाई करता येईल.पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे.कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलीस मदत करणार असल्याचे ते म्हणाले.
              श्री.घुगे यावेळी म्हणाले, उपस्थित शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडलेल्या समस्यांची दखल घेण्यात येईल.त्या समस्या निश्चितपणे सोडविण्यात येतील.डीजेचे प्रदूषण करण्यापेक्षा पारंपारिक वाद्यांचा वापर केल्यास पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांना रोजगार उपलब्ध होईल.गणेश मंडळांनी रात्री वाचनाचे कार्यक्रम आपल्या गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करावे असे ते यावेळी म्हणाले.    
         वाशिम उपविभागीय अधिकारी श्री पुजारी यांनी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांची यावेळी माहिती दिली.एक खिडकी योजनेतून गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याचा यावर्षी विचार करण्यात येत आहे.मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी.गणेश मंडळाच्या ठिकाणी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे लावावे.डीजे आणि ध्वनीक्षेपकाचे नियम सर्व मंडळांनी पाळावे.मिरवणुकीच्या काळात आक्षेपार्ह घोषणा देणे,अश्लील वागणूक करणे,एका विशिष्ट ठिकाणी मिरवणूक रेंगाळत ठेवणे,गुलालाची व्यवस्थित उधळण होईल याकडे लक्ष द्यावे.कोणालाही इजा पोहोचेल तसेच कोणाचे मन दुखेल असे वर्तणूक असू नये.हिंदू व मुस्लिम समाजाचे दोन्ही सण एकाच वेळी येणार असल्यामुळे सर्वांनी हे सण आनंदाने साजरे करावे. पोलीस प्रशासनावर ताण पडणार नाही यासाठी सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी.असे त्यांनी सांगितले.
             यावेळी गणेश मंडळ व शांतता समिती सदस्यांच्या वतीने बाळासाहेब खरात (रिसोड) यांनी समस्या मांडल्या. ते म्हणाले, रिसोड तालुक्यात गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण उत्सव दोन्ही समाज गुण्यागोविंदाने साजरे करतात.गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे.या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे.शहरात लावलेले झेंडे कार्यक्रमानंतर चार दिवसात काढले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
        मौलाना अन्सार (मंगरूळपीर)  म्हणाले,दोन समाजाचे सण हे एकाच वेळी येत आहे,ही आनंदाची बाब आहे.दोन्ही सण एकत्र येताना त्याचा सन्मान राखला जातो.एकात्मतेची भावना वृद्धिंगत होते.समाजात सणाच्या काळात आनंदाचे वातावरण असावे.दोन्ही समाजाच्या उत्सव सणात दोन्ही समाजाने सहभागी होऊन आनंद घ्यावा.झेंडे लावताना त्याचे नियोजन असले पाहिजे. सण उत्सवाच्या काळात रस्ते चांगले असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            कारंजा येथील राजाभाऊ चव्हाण म्हणाले,कारंजा शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहे. ही कामे गणेशोत्सव सुरू होण्यापुर्वी पूर्ण करावी.अधिकारी येतील जातील परंतु नागरिक हे तेथेच राहणारे आहेत.त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे.तरुण मंडळींनी सर्व सण उत्सवात आनंदाने सहभागी व्हावे.कुठे वाईट घटना घडुन पोलीस केसेस लागणार नाही,याची दक्षता युवा मंडळींनी घ्यावी.
            यावेळी पोलीस निरीक्षक श्री.धंदर यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांनी रितसर आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात. गणेश मंडळाची जागा सुरक्षित व आक्षेपार्ह ठिकाणी नसावी.सर्वांनी स्वयंसेवक नेमावे.मिरवणुकीत शिस्तीचे पालन करावे.डीजेच्या आवाजाची मर्यादा निश्चित असावी. त्याची परवानगी घ्यावी.मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन वेळेत करावे.     
        शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपैकी विजय भोसले,नंदू शिंदे,शेख जुल्फीकार,संतोष तिखे,युनूस मिर्झा, विजय जाधव,दिलीप जोशी,गजानन अमदाबादकर व वनमाला पेंढारकर यांनीही समस्या मांडल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी केले.संचालन पोलीस उपनिरीक्षक श्री. चौधरी यांनी केले.उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी मानले. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक,सर्व तहसीलदार,सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी,गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे