27 हजार लाभार्थ्यांना मिळाला शासन आपल्या दारीतून योजनांचा लाभ
- Get link
- X
- Other Apps
27 हजार लाभार्थ्यांना मिळाला
शासन आपल्या दारीतून योजनांचा लाभ
वाशिम, दि. 11 (जिमाका) : वाशिम तालुक्यात जून व जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या महसूल मंडळनिहाय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत आयोजित शिबीरात तालुक्यातील 27 हजार 659 लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभासह दाखले व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या शिबीरात एक खिडकी योजनेअंतर्गत 22 हजार 422 लाभार्थ्यांना सर्वाधिक उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेअर, अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबीराच्या आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनेच्या लाभातून लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. लाभार्थ्यांना योजनांची माहिती देण्यासोबत त्यांना कोणत्या योजनेचा लाभ पाहिजे आह, याची माहिती यंत्रणांनी जाणून घेवून तातडीने लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. यंत्रणा थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहचत असल्यामुळे लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. वाशिम तालुक्यात महसूल मंडळस्तरावर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित शिबीरात 27 हजार 659 लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभासोबत विविध प्रमाणपत्र व दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
वाशिम तालुक्यात सर्वाधिक 22 हजार 422 लाभार्थ्यांना एक खिडकी योजनेअंतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, अधिवास व जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला अनुदान, संजय गांधी निराधार योजनेच्या 127 लाभार्थ्यांना, नैसर्गिक आपत्तीमुळे राहत्या घराची पडझड झाल्याने 2 घराच्या मालकांना, वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या वारसास व एका गायीचा वीज पडून मृत्यू झाल्याने तिच्या मालकास तर 388 शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने या शिबीराच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यात आले.
विविध धान्य योजनेच्या 192 कुटूंबांना नविन शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. 494 जणांचे शिधापत्रिकेतून नांव कमी करण्यात आले. 318 जणांना दुय्यम शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. अभिलेख कक्षाकडून तयार करण्यात आलेल्या सातबारांचे वितरण 966 शेतकऱ्यांना करण्यात आले. 186 शेतकऱ्यांना हक्क नोंदणी अभिलेख वितरीत करण्यात आले. 984 जणांना कोतवाल बुकाची नक्कल देण्यात आली. 150 शेतकऱ्यांना खासरा पत्रक, 165 शेतकऱ्यांना पेरेपत्रक, 731 शेतकऱ्यांना फेरफार अभिलेख तर 5 शेतकऱ्यांना सलोखा योजनेचा लाभ देण्यात आला. शासन आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित शिबीरात लाभार्थ्यांना व नागरीकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच प्रमाणपत्रे व दाखले त्वरीत वितरीत करण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांना व नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी लाभ व प्रमाणपत्रे व दाखले मिळण्यासाठी न जाता मंडळस्तरावरच त्यांना लाभ देण्यात आल्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थी व नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment