1 ते 30 सप्टेंबर दरम्यानपोषण महिन्या अंतर्गत विविध उपक्रम




1 ते 30 सप्टेंबर दरम्यान

पोषण महिन्याअंतर्गत विविध उपक्रम

       वाशिम, दि. 05 (जिमाका) 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे.  सप्टेंबर 2023 या महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. हे अभियान राज्यभर राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या अभियानाअंतर्गत महिला व बालकांचे पोषण व आरोग्य या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाचे विविध विभाग या अभियानामध्ये सहभागी झाले आहे.

           1 ते 5 सप्टेंबरदरम्यान पोषण महिन्याचे उदघाटन करण्यात आले असून माझी माती माझा देश, पोषण रॅली, स्तनपानाबाबत जनजागृती, औषधीयुक्त वनस्पतींचे रोपण करुन सार्वजनिक ठिकाणी तसेच अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत व पंचायत समिती येथे पोषण वाटीका तसेच गावपातळीवर, तालुकास्तरावर तयार करण्यात आल्या आहे. सॅममॅम बालकांचा शोध घेण्यासाठी 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. 6 सप्टेंबर रोजी घरोघरी योग, कुटूंबासोबत योग अभियानाअंतर्गत घरोघरी अंगणवाडी केंद्रावर व घरोघरी योग शिबीराचे आयेाजन करण्याबाबत जनजागृती तसेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरी मुलींकरीता अंगणवाडी केंद्रात योग शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी गरोदर स्त्रिया यांची ॲनिमिया तपासणी, उपचार व समुपदेशन करणे व गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे. ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने गावपातळीवर जाणिव जागृती करुन ॲनिमिया तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे. 8 सप्टेंबर रोजी पुरक पोषण आहारासंदर्भात माहितीपट व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 9 सप्टेंबर रोजी गरोदर स्त्रिया व स्तनदा माता 6 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी व किशोरी मुलींसाठी ॲनिमिया तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरातून उपचार आयएफए व जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे.

           10 सप्टेंबर रोजी आहाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, समुदाय आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयस्तरावर गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्याकरीता आहाराबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्रामध्ये दुषित पाण्यापासून होणारे आजार याबाबत गरोदर स्त्रिया व स्तनदा माता तसेच कुटूंबांमध्ये जाणिव जागृती निर्माण करणे तसेच डायरिया झालेल्या बालकांसाठी पोषण व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 12 सप्टेंबर रोजी कुपोषण रोखण्यासाठी आयुष संदर्भातील विविध उपक्रम व साहित्यांचा वापर करुन विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 13 सप्टेंबर रोजी हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

           14 सप्टेंबर रोजी अंगणवाडीस्तरावर विविध पौष्टीक आहाराचे पाककृती प्रदर्शन आयोजित करुन आहाराबाबत जाणिव जागृती करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी अंगणवाडीमध्ये तसेच बाल वयातील लठ्ठपणा याबाबत मार्गदर्शन. 16 सप्टेंबर रोजी किशोरवयीन मुलींकरीता मासिकपाळी संदर्भात शिबीर. 17 सप्टेंबर रोजी गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्याकरीता स्तनपान संदर्भात मार्गदर्शन. 18 सप्टेंबर रोजी एनआरसीमध्ये बालकांना दाखल करण्याबाबत मार्गदर्शन. 19 सप्टेंबर रोजी शाळांवर आधारीत कार्यक्रमांचे आयोजन करुन पोषण घटकांची कमतरता व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पोषण प्रश्नोत्तरी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

           20 सप्टेंबर रोजी स्वस्थ बालक स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये 6 महिने ते 3 वर्ष आणि 3 वर्ष ते 5 वर्ष या वयोगटातील सुदृढ बालक शोधणे, 5 वर्षाखालील बालकांचे वजन व उंची मोजणे, याबाबत अंगणवाडीस्तरावर दक्षता घेणे यासंदर्भात जाणिव जागृती करण्यात येणार आहे. 21 सप्टेंबर रोजी अम्मा की रसोईच्या संकल्पनेचे प्रमोशन करण्यात येणार आहे. 22 सप्टेंबर रोजी बालकांमधील मधुमेह शोधण्याकरीता स्क्रिनिंग राबविण्यात येणार आहे. यामध्ये हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 23 सप्टेंबर रोजी मुलींच्या जन्माचे स्वागत कार्यक्रम गावस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. 24 सप्टेंबर रोजी महिला बचतगटांची सभा घेण्यात येणार आहे.  

           25 सप्टेंबर रोजी गृह भेटीतून गरोदर स्त्रियांना आयएफए गोळयांचे नियमित सेवनाबाबत व पोषणाबाबत समुपदेशन करणे, पोषण व शिक्षणाबाबत पालकांच्या भेटी घेवून जनजागृती करण्यात येणार आहे. 26 सप्टेंबर रोजी स्थानिक पोषण आहाराविषयी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व एएनएम यांच्या गृह भेटीव्दारे स्थानिक पोषण आहार जसे कडधान्य, भाजीपाला व पारंपारीक पाककृती इत्यादीबाबत पालकांचे गावस्तरावर समुपदेशन करण्यात येणार आहे. 27 सप्टेंबर रोजी पूर्व शालेय शिक्षणकृती याबाबतची माहिती अंगणवाडीस्तरावर देण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर रोजी बालकांचे लसीकरण नियमित व वेळेत करण्याबाबत गावपातळीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर रोजी आयवायसीएफबाबत जनजागृती कार्यक्रम आणि 30 सप्टेंबर रोजी सर्व विभागाव्दारे पोषण अभियान प्रतिज्ञा व पोषण महिना समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पोषण महिनानिमित्त राबविण्यात येणारे हे कार्यक्रम गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे.

           पोषण महिन्यादरम्यान धडक मोहिमेअंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी नियमित सुरु राहील. जल जीवन मिशनअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच आधार नोंदणी 100 टक्के करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश