27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत श्री गणेश विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश




27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत

श्री गणेश विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 27 (जिमाका)  जिल्हयात श्री गणेश विसर्जन 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान सार्वजनिकरित्या मिरवणुका काढून करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक दरम्यान गणेश मंडळाकडून मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशुल, कटयार असे प्रत्येक वाहनावर घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पार्श्वभूमी आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून सार्वजनिक सण उत्सव काळात व इतर कारणावरुन जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पुर्व इतिहास आहे. जातीय दंगलीचे व गणेशोत्सव काळात दाखल गुन्हयांच्या आकडेवारीनुसार जिल्हा सण, उत्सवाच्यादृष्टीने व जातीयदृष्टया संवेदनशील असल्याचे स्पष्ट होते. जातीय दंगलीच्या गुन्हयातसुध्दा तलवारीचा वापर करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे.

             श्री.गणेश विसर्जनादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून जातीय दंगल घडून आल्यास, विसर्जनादरम्यान शक्ती प्रदर्शनाकरीता वाहनांवर लावण्यात आलेल्या घातक शस्त्रांचा वापर एकमेकांविरुध्द मारक शस्त्र म्हणून होवू शकतो. त्यामुळे जीवित हानी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता गणेश विसर्जनादरम्यान वाहनावर शक्ती प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने लावण्यात येणाऱ्या तलवार, त्रिशुल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कटयार आदी धारदार घातक शस्त्रांवर बंदी घालण्यात येत आहे. तरी श्री गणेश विसर्जन मिरवणूक काळात 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हयात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे या आदेशात नमुद केले आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे