सर्व पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड त्वरीत काढावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आयुष्मान भव व विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा




सर्व पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड त्वरीत काढावे

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

आयुष्मान भव व विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचा आढावा

       वाशिम, दि. 08 (जिमाका)  ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड हे अत्यंत उपयुक्त आहे. जिल्हयातील कोणताही पात्र लाभार्थी आयुष्मान कार्डपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत आयुष्मान कार्ड जवळच्या सीएससी केंद्र, आशा सेविका, आपले सरकार केंद्र व अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र तसेच संकेतस्थळावर मोफत  काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

           7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयुष्मान भव मोहिम आणि विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम 2023 ची दुसरी फेरी तसेच एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा देखील आढावा घेतला. यावेळी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. पराग राठोड, डॉ. स्वप्नील हाके, डॉ. रणजीत सरनाईक व डॉ. आर.के. ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

           केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी "आयुष्मान भव" ही मोहीम असल्याचे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, ग्रामीण व शहरी भागातील पात्र नागरीकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सर्व आरोग्य संस्थांमध्ये या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. अंगणवाडी व शाळांमधून कुपोषित व तिव्र कुपोषित बालकांचा या मोहिमेदरम्यान शोध घ्यावा. त्यांची आरोग्य तपासणी करावी. जिल्हयात अशाप्रकारचे किती बालक आढळून आले आहेत त्याची माहिती संकलीत करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

           जिल्हयातील कोणताही पात्र बालक ते वृध्द नागरीक हा आयुष्मान भव मोहिमेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, या मोहिमेअंतर्गत त्यांच्या सर्व आरोग्य तपासण्या करण्यात याव्यात. या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील पात्र असलेल्या जास्तीत जास्त नागरीकांना आयुष्मान भव मोहिमेचा लाभ दयावा. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

       आयुष्मान भव मोहीम देशामध्ये १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. आयुष्मान मेळाव्याअंतर्गत रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंडाचा, गर्भाशयाचा व स्तनाचा) क्षयरोग, कुष्ठरोग यासारखे अन्य संसर्गजन्य आजार, माताबाल तपासणी, पोषण व लसिकरण, डोळयांची तपासणी आणि काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हयात सर्वत्र आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सरनाईक यांनी यावेळी दिली. 

         या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करणे असे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजित आहे. आयुष्मान आपल्यादारी ३.० या उपक्रमांअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील १ लक्ष ७५ हजार २४८ पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबातील ६ लक्ष २३ हजार २४४ सदस्य पात्र लाभार्थी आहे.  https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळाव्दारे पात्र लाभार्थी स्वतःचे कार्ड स्वतः काढू शकतात. 

         जिल्ह्यात एकूण १२ अंगीकृत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून योजनेअंतर्गत २५ विशेषज्ञ सेवाच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. या आरोग्य सेवेचा लाभ आयुष्मान कार्डच्या आधारे घेता येतो.  योजनेविषयी अधिक माहीतीकरीता https://www.jeevandayee.gov.in,  या संकेतस्थळाला भेट दयावी.  टोल फ्री क्रमांक १८०० २३३ २२००, १५५ ३८८ तसेच आरोग्यमित्र, जिल्हा कार्यालय यांचेशी संपर्क करावा.

          आयुष्मान मेळावा उपक्रमामध्ये आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य नेत्र, कान, नाक, घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा योगा, व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी प्रयोगशाळा तपासणी, तसेच टेलीकंसल्टेशन सेवा देण्यात येणार आहेत. ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व प्राथमिक शाळातील मुलांची आरोग्य तपासणी करुन मुलांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. याच वयोगटातील मुलांचे ४ डेफेक्टस (Defects at birth, Development delays, Deficiencies and diseases) यांची तपासणी करण्यात येणार आहे.

           विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम ऑगस्ट 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिला फेरी 7 ते 12 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली आहे. दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर आणि तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत लसिकरणापासून वंचित राहिलेले व अर्धवट लसिकरण झालेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करुन त्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे