बचत गटातील महिलांनी तेजश्रीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा
बचत गटातील महिलांनी तेजश्रीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा
आयुक्त डॉ विजयकुमार फड यांचे
अमानी येथील उपक्रमाची पाहणी
वाशिम दि.५(जिमाका) मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत तेजश्री फायनान्सियल सर्विसेसच्या माध्यमातून माविम बचत गटाच्या महिलांना उद्योग उभारणीसाठी अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.याचा लाभ महिलांनी घेऊन आपला आर्थीक विकास साधावा. असे प्रतिपादन मानव विकास कार्यक्रमाचे आयुक्त डॉ विजयकुमार फड यांनी केले
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशीमद्वारा संचालित लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव २ च्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत तेजश्री फायनान्सियल सर्विसेस हा उपक्रम सुरु आहे. यामधून बचत गटातील महिलांना अल्प व्याजदरामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.याचाच एक भाग म्हणून अमानी येथील माविम बचत गटातील अनुसूचित जाती जमातीतील महिलांनी सुरु केलेल्या गोडंबी व्यवसाय उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ विजयकुमार फड यांनी ३ ऑगस्ट रोजी अमानी या गावी भेट दिली.यावेळी ते महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री.फड पुढे म्हणाले, मानव विकास कार्यक्रमाने महिला बचत गट उद्योगाला चालना देण्यात काम केले आहे.तेजश्रीमधून केवळ आठ टक्के व्याजदराने कर्ज दिल्या जाते. त्यामुळे महिलांना एक संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा महिलांनी घेऊन आपल्या उद्योगात वाढ करुन विकास साधावा.सदैव सकारात्मक विचार करूनच दुसऱ्यांना मदत करावी. अंतर्गत कलह करू नये. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे. दुसऱ्यांचा द्वेष न करता विचार सहकार्याचे ठेवावे. मानव विकासने आपणास प्रेरणा देण्याचे काम केले आहे. याचा महिलांनी लाभ घेऊन विकास साधावा.असे श्री. फड यावेळी म्हणाले.
लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव २ यांनी गोडंबी उपक्रमाबद्दल समाधान डॉ. फड यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासमवेत मानव विकास कार्यक्रमचे उपायुक्त विनयकुमार कुलकर्णी,उपायुक्त श्री.भांगे,जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावर आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविकातून लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव २ चे व्यवस्थापक प्रा.शरद कांबळे यांनी माविम सीएमआरसी मालेगाव २ अंतर्गत सुरु असलेल्या मानव विकास कार्यक्रम उपक्रमाची माहिती यावेळी दिली. तसेच सीएमआरसी मालेगाव २ मार्फत सुरु असलेल्या गोडंबी ट्रेडिंग व मार्केटिंगबाबत देखील सविस्तर माहिती दिली. यावेळी गाव विकास समिती अमानीचे सर्व सदस्य गटाच्या महिला सीएमआरसी मालेगाव २ चे लेखापाल हेमंत सावळे सहयोगिनी चंद्रभागा माने, सीआरपी वनिता अंभोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment