प्रशासनाने केलेल्या विद्युत रोषणाईने उजळली स्वातंत्र्य सैनिकांची घरे
प्रशासनाने केलेल्या विद्युत रोषणाईने उजळली स्वातंत्र्य सैनिकांची घरे
वाशिम दि.१४ (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. संपुर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले,त्यांच्या घरावर प्रशासनाकडून या वर्षी विद्युत रोषणाई केल्याने त्यांची घरे विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना कारावास भोगावा लागला. तसेच अनेकांना प्राणाची आहुती द्यावी लागली.स्वातंत्र्य सैनिकांच्या या योगदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.त्यांचा विसर पडू नये तसेच त्यांच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरांवर प्रशासनाकडून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्राम लढ्यात योगदान देणारे एकही स्वातंत्र्य सैनिक आज जिवंत नसले तरी त्यांच्या विधवा पत्नी व वारसांकडे प्रशासनाचे काळजीपूर्वक लक्ष आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी त्यांच्या घरी प्रशासनाने विद्युत रोषणाई करून त्यांच्या त्यागाची आठवण प्रशासनाला,शासनाला व नागरिकांना आजही कायम आहे.हे दिसून येते.
वाशिम येथील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जनार्दन खेडकर,रिसोड तालुक्यातील चिचाम्बापेन येथील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय अनंतराव सरनाईक,रिसोड शहरातील स्व. मन्नालाल बगडे,स्व.विठ्ठलराव काटोले, स्व.मोतीराम बोटके,स्व.मनोहर कानडे आणि मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील स्व. पद्मश्री रामसिंग भानावत यांच्यासह इतरही काही स्वातंत्र्य सैनिकांच्याही घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment