लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनाची काळजी घ्या



लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी

पशुधनाची काळजी घ्या

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

         वाशिम, दि. 30 (जिमाका) : राज्यात सध्या अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्हयात पाळीव जनावरांना लम्पी स्किन डिसीस रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी पुढील आवश्यक उपाययोजना व शेतकऱ्यांनी त्यांच्या पशुधनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोग हा गोट पॉक्स विषाणु (देवी) लम्पी स्किन रोग विषाणुमुळे गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरामध्ये होतो.

         या रोगाची लक्षणे- सुरुवातीचे २-३ दिवस हलका ताप येतो त्यानंतर जनावराच्या कातडीवर साधारणत: २-५ सेमी आकाराच्या घट्ट गाठी येतात. याशिवाय काही बाधित जनावरांच्या तोंडामध्ये, श्वसन नलिकेमध्ये, घशामध्ये गाठी येतात. दुध देण्याचे प्रमाण कमी होते. अशी लक्षणे गावातील पाळीव जनावरांना दिसुन आल्यास सचिवांमार्फत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना तसेच गट विकास अधिकारी व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोगाचा प्रसार माशा, गोचिड, डास व पिसवा इत्यादीपासुन होतो.

          या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जनावरांच्या गोठयात २० टक्के इथर व क्लोरोफार्म, १ टक्के फॉर्मलिन, २ टक्के फिनॉल (१५ मिनिटे), आयोडीन जंतनाशके १:३ प्रमाणात पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करण्यात यावी. आजारी जनावरांवर नजीकच्या पशुवैद्यकाकडून औषधोपचार करुन घ्यावे. अजारी जनावरांना तात्काळ इतर निरोगी जनावरापासुन वेगळे ठेवावे. लम्पी स्किन डिसीस रोगाची लस उपलब्ध झाल्यावर जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती डॉ. शाम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्हि.एन.वानखडे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे