पिक स्पर्धा खरीप हंगाम - 2022nशेतकऱ्यांनी सहभागी व्हावे कृषी विभागाचे आवाहन



पिक स्पर्धा खरीप हंगाम - 2022

शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

कृषी विभागाचे आवाहन

 

         वाशिम, दि. 10 (जिमाका) : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. त्यामुळे अधिक उमेदीने नवनवीन व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करतात. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळावे, त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन जिल्हयाच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

           सध्याच्या खरीप हंगाम – 2022 या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हयाकरीता खरीप हंगाम पिक स्पर्धेसाठी सोयाबीन व तूर या पिकाचा समावेश आहे. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 आणि आदिवासी गटासाठी 5 शेतकरी अशी निश्चित करण्यात आली आहे. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी हे जाहिर करतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. सर्व गटासाठी पिकनिहाय प्रवेश शुल्क प्रत्येकी 300 रुपये आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

           पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपले अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरुन त्यासोबत भरुन दिलेले प्रवेश शुल्क, चलान, सातबारा, आठ-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पुर्तता करुन संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पिक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसांचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षिस - 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस - 3 हजार रुपये व तृतिय बक्षिस - 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस - 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस - 7 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस - 5 हजार रुपये. विभाग पातळीवर पहिले बक्षिस - 25 हजार रुपये, दुसरे बक्षिस - 20 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस - 15 हजार रुपये आणि राज्य पातळीवर पहिले बक्षिस - 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस - 40 हजार रुपये आणि तिसरे बक्षिस - 30 हजार रुपये आहे. हे बक्षिस सर्वसाधारण व आदिवासी गटांकरीता देण्यात येणार आहे.

           पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पिक स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. सोयाबीन व तूर पिकासाठी 31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.       

                                                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे