जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट



जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील

मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट

         वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 30 ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील काटा या गावी भेट देऊन मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळेतील मतदान बुथला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, तहसिलदार विजय साळवे व महाआयटीचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         काटा येथील मतदान बुथवर उपस्थित असलेले मतदार केंद्रस्तरीय अधिकारी सुनिता वाघ, गजानन गायकवाड आणि किशोर धामणे यांचेकडून 1 ऑगस्टपासून आतापर्यंत किती मतदार ओळखपत्रांचे आधार क्रमाकांशी जोडणी करण्यात आली याबाबतची माहिती श्री. षण्मुगराजन यांनी जाणून घेतली. 10 सप्टेंबरपर्यंत गावातील सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. आधार लिंकींगचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी कमी प्रमाणात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थीतीत येत्या 10 सप्टेंबरपर्यंत गावातील सर्वच मतदारांचे मतदार ओळखपत्रासोबत त्यांचा आधार क्रमांक जोडण्याचे निर्देश संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना यावेळी श्री. षण्मुगराजन यांनी दिले. उपस्थित गावकऱ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून या उपक्रमाविषयी जनजागृती करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

          जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी काटा ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या सीएससी केंद्राला भेट दिली. 31 ऑगस्टपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टिने कोणत्याही परिस्थीतीत संबंधित शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिल्या. गावात याबाबत दवंडी देऊन शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सीएसएसी केंद्रात येण्याचे आवाहन करावे. असे त्यांनी यावेळी सुचविले. 478 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 225 शेतकऱ्यांची ई-केवायसी केल्याची माहिती ऑपरेटर आकाश बच्चेवार यांनी यावेळी दिली.

                                                                                                                                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे