घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत मोटार सायकल रॅली घोषणा व गीतांनी दुमदुमले वाशिम

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत

मोटार सायकल रॅली

घोषणा व गीतांनी दुमदुमले वाशिम 

·        युध्दातील वीर पत्नी व मातांची मिरवणूक

·        माजी सैनिक, पोलीस व होमगार्डचा समावेश

·       एन.सी.सीचे व विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

 

         वाशिम, दि. 12 (जिमाका) :  भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पुर्ण होत आहे. देशभर आनंदाचे वातावरण आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरीकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज 12 ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. आणि पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, शिक्षणाधिकारी रमेश तांडगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे व लेखाधिकारी युसूफ शेख यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलीस बॅन्ड पथक व उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले.

          प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. षन्मुगराजन यांनी 1965 च्या भारत-पाक युध्दातील शहिद शिपाई यशवंत सरकटे यांच्या वीरपत्नी शांताबाई सरकटे, 1993 मध्ये शत्रुंशी लढताना जम्मु कश्मीर येथे शहिद झालेले योगराज नागुलकर यांच्या पत्नी मीराबाई नागुलकर आणि जम्मुकश्मीर येथे 1994 मध्ये शत्रुंशी लढतांना वीर मरण आलेले लान्सनायक दगडू लहाने यांच्या पत्नी पार्वती लहाने यांचा पुष्पहार देवून सत्कार केला. या शहिदांच्या पत्नींची या रॅलीतून शहरातील मुख्य मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.

          मोटार सायकल रॅलीमध्ये माजी सैनिक, पोलीस, होमगार्ड तसेच श्री. बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थींनी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी देखील मोटर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

          रॅलीदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता की जय, यासह विविध देशभक्तीवर आधारीत घोषणा तसेच रॅलीमध्ये ऐ मेरे वतन के लोगो, संदेश से आते है  यासह विविध देशभक्तीवर आधारीत गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. या घोषणा व देशभक्तीमय गीतांनी वाशिमचा परिसर दुमदुमुन गेला होता. देशासाठी विरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नींचे चौकाचौकात पुष्पवर्षाव आणि पुष्पगुच्छ देऊन चौकात उपस्थित असलेल्या नागरीकांनी त्यांचे स्वागत केले.

          ही मोटार सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून सिव्हील लाईन मार्गे, श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय, बस स्टॅन्ड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिघेवाडी, बालू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, श्री शिवाजी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्रीमती मालतीबाई सरनाईक शाळा, बस स्टॅन्ड चौक, नवीन नगर परिषद कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, आहाळे हॉस्पीटल व राजस्थान आर्य महाविद्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचली.

रॅलीतील सहभागी विद्यार्थीनींनी पोलीस अधिक्षक कार्यालयात लावण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध शस्त्रांची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती असणाऱ्या घडीपुस्तिका विद्यार्थीनींना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधिक्षक बच्चन सिंह व अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांनी सेल्फी पॉईंटला भेट देऊन सेल्फी काढला. यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

          या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव, श्री. आहाळे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सर्वाचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे