वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश · जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा
- Get link
- X
- Other Apps
वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
· जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज 30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा श्री. षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ भरत गिते, शेतकरी सुरेश सानप, अनिल पाटील, राधेश्याम मंत्री व पिक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक सोमेश देशमुख यांची उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विमा कंपनीने 3 सप्टेंबरपर्यंत पीक नुकसानीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना अर्जाद्वारे 72 तासाच्या आत दिली पाहिजे. नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्यांनी योग्य त्या वेळेत संबंधित क्रॉप इन्सुरन्स ॲप्लीकेशनवर करावी असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील 2 लक्ष 76 हजार 303 शेतकऱ्यांनी सन 2022-23 च्या खरीप हंगामात 2 लक्ष 7 हजार 213 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. त्यापैकी 62 हजार 283 हेक्टर क्षेत्र पंचनाम्यासाठी पात्र ठरले आहे. यंदाच्या खरीप हंगामात 3 लक्ष 90 हजार 286 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे 492 सर्व्हेअरच्या माध्यमातून आजपर्यंत 50 हजार 577 शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. देशमुख यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment