महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद



महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस

जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद

नवसंकल्पनांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी

कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्तांचे आवाहन

         वाशिम, दि. 30 (जिमाका) : राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते १५ ऑगष्ट २०२२ रोजी करण्यात आला. महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा २५ ऑगष्टपासून जिल्हयातील विविध तालुकास्तरावर दाखल झाली आहे. या यात्रेचा चित्ररथ २ सप्टेंबर रोजी रिसोड तालुकास्तरावर व ३ सप्टेंबर रोजी वाशिम व मालेगांव या तालुकास्तरावर दाखल होणार आहे. जिल्हयातील नवउद्योजकांना जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत सहभागी होण्याकरीता www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

        नोंदणी करतांना नवउद्योजकांना प्रामुख्याने स्वतःचे नांव, पत्ता, संपर्क क्रमांक व सादरीकरण करण्यात येणाऱ्या संकल्पाना याविषयी किमान ३०० शब्दात माहिती दयावयाची आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या नवउदयोजक तसेच उमेदवारांसाठी वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. जिल्हयातील कोणताही व्यक्ती या सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेवू शकतो. संकेतस्थळावर नोंदणीकृत नवउद्योजकांना प्रामुख्याने पुढील ७ विविध क्षेत्रात त्यांची संकल्पना सादर करता येईल. यात कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबीलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता व इतर क्षेत्राचा समावेश आहे.

        सादरीकरण केलेल्या संकल्पनांपैकी सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या ज्युरी समितीमधील तज्ञ सदस्यांकडून करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर सर्वोत्तम संकल्पना सादरीकरण करणाऱ्या नवउद्योजकांस प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक १० हजार रुपये असे घोषित करण्यात येईल. या घोषित बक्षिसांची रक्कम राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेच्या ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेमधील सर्वोत्तम सादरीकरणांपैकी एकूण सर्वोत्कृष्ट १४ संकल्पनांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांचे रोख स्वरुपातील पारितोषिक वितरीत करण्यात येणार असून त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविण्यात येणार आहे. यात इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील संस्थंना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स व इतर तत्सम लाभ/ सहाय्य पुरविण्यात येईल.

          तरी जिल्हयातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी तसेच युवक-युवतींनी वरील ठिकाणी आगमन होत असलेल्या फिरत्या चित्ररथ (मोबाईल व्हॅन) सोबतच्या चमूमधील समन्वयकाच्या मार्गदर्शनात www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीकृत उमेदवारांना
वाशिममध्ये नियोजित राजस्थान आर्य महाविद्यालय येथील जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा व प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संजय राऊत (9420106747), दिपक भोळसे (9764794037) व अतिष घूगे (9850983335) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

                                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश