क्रीडा संकुल सभागृहात फाळणी वेदना स्मृति दिनानिमित्त प्रदर्शन श्रीमती साधना खेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

क्रीडा संकुल सभागृहात
फाळणी वेदना स्मृति दिनानिमित्त प्रदर्शन 

श्रीमती साधना खेडकर यांच्या हस्ते उद्घाटन 

वाशिम दि.१४ (जिमाका) भारत आणि पाकिस्तान या देशांची १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी झाली. या फाळणी दरम्यान हजारो नागरिकांना यातना झाल्या.या फाळणीमुळे अनेकांना दुःख आणि मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्याप्रती असलेली सहवेदना आणि स्मृती आपल्या स्मरणात कायम राहाव्यात यासाठी फाळणी वेदना स्मृति दिनानिमित्त आज १४ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र सैनिक स्वर्गीय जनार्दन खेडकर यांच्या पत्नी श्रीमती साधना खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाशिम तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या प्रदर्शनात भारत पाकिस्तान फाळणी दरम्यानच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. ब्रिटिश सरकारने फाळणी दरम्यान केलेली मध्यस्थाची भूमिका, ४ जून १९४७ च्या ऐतिहासिक पत्रकार संमेलनाची छायाचित्रांसह बातमी, फाळणीसाठी संकल्पबद्ध असलेल्या मुस्लीम लीगचे चर्चेदरम्याचे छायाचित्र, २ जून १९४७ ला भारतीय नेत्यांसोबत लॉर्ड माऊंटबॅटन चर्चा करतानाचे छायाचित्र, दुसऱ्या महायुद्धामुळे लाहोरचा उद्ध्वस्त झालेला नाटा बाजार, फाळणीबाबतचे तत्कालीन प्रसारमाध्यमांचे मत, फाळणीबाबतच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणे, पश्चिम बंगालमध्ये वाहतूक साधनांच्या प्रतीक्षेत असलेली शरणार्थी यांची वेदनादायक छायाचित्रे, मुंबई येथील बंदरावर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असलेली शरणार्थी, बैलगाडी, मोटारी, टांगे, रेल्वे आणि पायदळ निघालेले शरणार्थी अशा अनेक छायाचित्रांचा आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या कात्रणांचा या प्रदर्शनात समावेश आहे.
         या प्रदर्शनातून आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती हालअपेष्टा सहन केल्या याची प्रचिती येते.
    उद्घाटनप्रसंगी अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सर्वांना हे प्रदर्शन बघता यावे यासाठी १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दयावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे