जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई-पीक पाहणी सीएससी केंद्राला भेट व इमारत बांधकामाची पाहणी



जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई-पीक पाहणी

सीएससी केंद्राला भेट व इमारत बांधकामाची पाहणी

         वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 25 ऑगस्ट रोजी कारंजा तालुक्यातील गायवळ, शेलूवाडा व कोळी या गावांना भेट देऊन ई-पीक पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या पीक परिस्थीतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तहसिलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्री. चौधरी व संबंधित गावचे तलाठी उपस्थित होते.

           श्री. षण्मुगराजन यांनी ई-पीक पाहणी मोबाईलच्या ॲपवरुन शेतकऱ्यांना करता येते का तसेच ई-पीक पाहणी करतांना येणाऱ्या अडचणी याबाबतची माहिती उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली. ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये तलाठी व कृषी सहायक यांनी मोठया प्रमाणात जनजागृती करावी. शेतकऱ्यांना याबाबत येत असलेल्या अडचणी सोडविण्याचे निर्देश त्यांनी तलाठी व कृषी सहायकांना दिले. कारंजा शहरातील सीएसएसी केंद्राला भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या ई-केवायसीबाबतची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपवरुन किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन 31 ऑगस्टपर्यंत ई- केवायसी करुन घ्यावी. अन्यथा ई-केवायसी न केल्यास या योजनेच्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. कारंजा तालुक्यातील 38 हजार पात्र शेतकऱ्यांपैकी 11 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तहसिलदार श्री. मांजरे यांनी यावेळी दिली. कारंजा येथे बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची देखील श्री. षण्मुगराजन यांनी पाहणी करुन तातडीने बांधकाम पुर्ण करण्याचे निर्देश दिले.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे