समाज कल्याणच्या चित्ररथ व डिजीटल रथाचा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
समाज कल्याणच्या चित्ररथ व डिजीटल रथाचा
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि. 08 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत तयार केलेल्या समता चित्ररथ व समता डिजीटल रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज 8 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय इमारत परिसरात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाज कल्याण कार्यालयाचे लघु टंकलेखक संजय निमन, समाज कल्याण निरीक्षक श्री. शिरभाते, जिल्हा माहिती कार्यालयातील राजू जाधव, विजय राठोड, अनिल कुरकुटे व गजानन डहाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
समता चित्ररथ व समता डिजीटल रथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांवर तयार केलेला ‘दिशा परिवर्तनाची’ हा माहितीपट आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, मार्जिन मनी योजना, शेळी गट वाटप योजना व कन्यादान योजना या योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडीओ दाखविण्यात येणार आहे. दिशा परिवर्तनाची या माहितीपटात जिल्हयातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई आवास योजना, मुलां-मुलींसाठी वसतीगृह येाजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना आदी योजनांवर आधारीत यशोगाथा या माहितीपटातून दाखविण्यात आल्या आहे.
समता चित्ररथ व समता डिजीटल रथ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक गावात जाणार असल्यामुळे संबंधित घटकांच्या लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चित्ररथाचे प्रमोटर संबंधित ग्रामपंचायतीला समर्पण ही माहिती पुस्तिका चित्ररथावरील माहितीपट व ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स बघणाऱ्या नागरीकांना वाटप करणार आहे.
*******
Comments
Post a Comment