कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पादित मालाची विक्री करण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना पांडुरंग तावरे जिल्हा रौप्य महोत्सवानिमित्त कृषी पर्यटन कार्यशाळा

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पादित मालाची विक्री करण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना
                              पांडुरंग तावरे

जिल्हा रौप्य महोत्सवानिमित्त कृषी पर्यटन कार्यशाळा 

वाशिम दि.1(जिमाका) राज्यात कृषी क्षेत्रातून पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने सन 2020 मध्ये राज्य कृषी पर्यटन धोरण तयार केले.त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी शेतीला पर्यटनाची जोड देणे आवश्यक आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी भागातील माणूस शेताकडे आला तर तो ग्रामीण संस्कृतीशी जोडला जाईल. शेतात उत्पादित मालाची कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विक्री होण्यास मदत होणार असून अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार असल्याने रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल.असे मत प्रसिद्ध कृषी पर्यटन प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार प्राप्त पुणे येथील शेतकरी पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले.
       आज 1 फेब्रुवारी रोजी वाशिम येथील विधाता सभागृहात  जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रकल्प संचालक,आत्मा वाशिम आणि गीताई ह्यूमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त वतीने कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.तावरे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे एमटीडीसीचे पर्यटन अधिकारी सुनील येताळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व गीताई ह्यूमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड यांची उपस्थिती होती.
            श्री. तावरे म्हणाले, बालपण शेतात गेले.पर्यटन व्यवस्थापन व मार्केटिंग कसे करावे हे शिकलो. तांत्रिकदृष्ट्या पर्यटनाचे ज्ञान व दुसरीकडे हाडाचा शेतकरी अशी सांगड कृषी पर्यटन विकासासाठी घातली. शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकायला शिकले पाहिजे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी हा उत्पादित माल कृषी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना चांगल्या किमतीत जागेवरच विकू शकतो. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सोयाबीन विकून नाही तर सोयाबीन दाखवून पैसे कमवायचे आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना साधे सात्विक भोजन उपलब्ध करून द्यायचे आहे असे त्यांनी सांगितले.
                कृषी संस्कृतीचा अभिमान प्रत्येक शेतकऱ्याला असला पाहिजे असे सांगून श्री.तावरे म्हणाले, कृषी पर्यटनासाठी शेतात येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध प्रकारची पिके शेतात असली पाहिजे. कृषी पर्यटन क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे काम करून पुढे यायचे असेल तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाला त्यांनी भेट द्यावी. विद्यापीठांनी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग बघावे. तशाच प्रकारचे प्रयोग आपल्या शेतात करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा.साधा सात्विक आनंद कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांनी पर्यटकांना द्यावा. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पादित मालाचे विक्री केंद्र सुरू करावे. एका पर्यटकाच्या माध्यमातून दहा लोकांना रोजगार मिळण्यास मदत होते. पर्यटकांना गावाची संस्कृती, परंपरा व गावाच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात यावी. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करावे. कृषी पर्यटनामुळे घरातील सर्वांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना मानसन्मान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
              श्री.येताळकर म्हणाले, कृषी पर्यटनाचा उद्देश हा शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोककला, संस्कृती व परंपरेचे दर्शन शहरी भागातील नागरिकांना होऊन गाव व शहर ही दरी कमी होईल. ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावण्यास कृषी पर्यटनाची मदत होईल.वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये,कृषी विद्यापीठे व शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपनी ह्या कृषी पर्यटनासाठी पात्र घटक असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी पर्यटन केंद्र स्थापन करताना बंधनकारक व ऐच्छिक बाबी देखील त्यांनी यावेळी विशद केल्या.
         श्री. तोटावर म्हणाले,जिल्ह्यात मोठे उद्योग नाही. रोजगार नाही. जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित माल ग्राहकांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचविला पाहिजे हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. जिल्ह्यात जैविक शेतीला चालना देण्यात येत आहे. पूर्वी पोळी खाणारे श्रीमंत समजले जात होते.आता भाकरीची श्रीमंती वाढली आहे. कमी शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना कृषी पर्यटन विकसित करण्याला चांगली संधी आहे.कृषी विभागाच्या मदतीने कृषी पर्यटनाला चालना देण्यात येईल. यासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.जोगदंड म्हणाले,जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी आपली धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील कृषी पर्यटनातून विकासाला चालना द्यायची आहे.मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे सन 2005 पासून कृषी पर्यटनाला सुरुवात केली.समृद्धी महामार्गामुळे आता जिल्ह्यातील कृषी व अन्य पर्यटन विकासाला चांगली मदत मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. कमी गुंतवणुकीत चांगले आर्थिक उत्पन्न यातून मिळू शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले. 
           कार्यशाळेला जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी,कृषीमित्र,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी श्री.तावरे यांना कृषी पर्यटनाबाबत काही प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निराकरण केले. प्रास्ताविक अविनाश जोगदंड यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अविनाश मारशेटवार यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजेश घुगे,हरिदास बनसोड,अभिषेक देशमुख व शिवानंद गांजरे व जयकृष्ण लव्हाळे यांनी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे