मंगरुळपीर येथे समाज कल्याण योजनांच्या डिजीटल रथाचा शुभारंभ



मंगरुळपीर येथे समाज कल्याण योजनांच्या

डिजीटल रथाचा शुभारंभ

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : मंगरुळपीर पंचायत समिती येथे आज 17 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण योजनांच्या डिजीटल रथाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती हरिष महाकाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत तसेच पंचायत समितीचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

           समाज कल्याण विभागाच्या निवडक महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व नागरीकांना व्हावी, तसेच ही माहिती जाणून घेवून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने निवडक महत्वपूर्ण योजनांवर आधारीत दिशा परिवर्तनाची हा माहिती पट तयार केला आहे. या माहितीपटामध्ये जिल्हयातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई घरकुल योजना, मुला-मुलींसाठी वसतीगृहे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आणि कृषी स्वावलंबन योजना, नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास यासह अन्य योजनांवर आधारीत जिल्हयातील यशोगाथा माहितीपटातून दाखविण्यात आल्या आहे.

           तसेच 8 योजनांवर आधारीत ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स तयार करण्यात आले असून यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा, दुभत्या जनावरांचे गट वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आणि बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे यांचा समावेश आहे. डिजीटल रथावरुन दाखविण्यात येणाऱ्या माहितीपट व ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्समुळे लाभार्थी योजनांचा लाभ घेण्यास पुढे येतील.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश