जागरुक पालक,सुदृढ बालक अभियान जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश
- Get link
- X
- Other Apps
जागरुक पालक,सुदृढ बालक अभियान
जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी
० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश
वाशिम,दि.0८ (जिमाका) जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ० ते १८ वर्षे वयोगटातील ३ लाख २७ हजात १२७ बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरिता आरोग्य विभागांतर्गत जागरूक पालक,सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून दोन महिने राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कालबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील वरील वयोगटातील कोणताही पात्र बालक उपचारापासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी संबंधित यंत्रणेला श्री.षण्मुगराजन यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये,शासकिय व खाजगी आश्रमशाळा,अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाड्या,आदिवासी वसतिगृहे, खासगी नर्सरी, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महविद्यालयातील तसेच शाळाबाह्य असलेल्या ० ते १८ वर्षागटातील मुला मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.बालकांच्या तपासणीकरिता १४४ प्राथमिक तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकुण ८४४ शासकीय शाळा असुन ८५ हजार ४१० विद्यार्थी, अनुदानीत शाळेंमधील १ लक्ष ११ हजार ७०३ विद्यार्थी अशा एकूण ३ लाख २७ हजार १२७ मुलांची तपासणी करणार आहेत. ९ फेब्रुवारीपासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व बालकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे.यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाव्दारे बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, ह्दयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सीस व अन्य आजारांच्या संदिग्ध रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर त्वरीत औषधोपचार करणार आहे. तसेच ० ते ६ वयोगटातील मुलांमध्ये क्लब फुट, दुभंगलेली टाळु यावर देखील उपचार होणार आहे. नगरपालीका क्षेत्रातील संदिग्ध रुग्णांवर नागरी आरोग्य केंद्रावर तर ग्रामीण भागातील रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामिण रुग्णालयात उपचार केले जाणार आहे.यामध्ये आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, एक्सरे, ईसीजी केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालय किंवा आरोग्य विभागाशी संलग्नित झालेल्या इतर खासगी रुग्णालयातही शस्त्रक्रीया केली जाणार आहे.
० ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींची मोफत उपचार व शस्त्रक्रीया केली जाणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याची या अभियानादरम्यान आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment