नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात*संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण*
- Get link
- X
- Other Apps
नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात
*संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण*
वाशिम, दि १२(जिमाका) देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी,आमदार ॲड निलय नाईक,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज,महंत कबीरदास महाराज,महंत शेखर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
'ब' दर्जा प्राप्त या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने ५९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. याच विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पोहरादेवी दौ-यावर होते.यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे शक्तिशाली चिन्ह असलेला नंगारा वाजवुन आनंद व्यक्त केला.
भूमिपूजन झालेल्या विकास कामात पोहरादेवी येथील स्थानिक पायाभूत सुविधा व मंदिर सुशोभिकरण, नंगारा भवन वाढीव बांधकाम व अंतर्गत व्यवस्था,बायोलॉजिकल पार्क, संगमरवरी सामकी माता मंदिर, जगदंबादेवी मंदिर, प्रल्हाद महाराज मंदिर,जेतालाल महाराज मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज मंदिर बांधकाम सुशोभीकरण, सुसज्ज यात्री निवास, भाविकांसाठी सोई -सुविधा, प्रवेशद्वार, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पथदिवे, प्रदर्शन केंद्र, लकिशा बंजारा सुविधा केंद्र इत्यादीचा समावेश आहे.
नंगारा वास्तु संग्रहालय व परिसर विकासासाठी ६७ कोटी,उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी ३२६ कोटी २५ लक्ष रुपये तर संत रामराव बापु उद्यानासाठी २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.यामधुन ही विकास कामे करण्यात येणार आहेत.
०००००००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment