अपघातांची संख्या 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभागाची विशेष मोहिम अपघातमुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार



अपघातांची संख्या 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी

परिवहन विभागाची विशेष मोहिम

अपघातामुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार

       वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हयात वाहनांच्या संख्येत व त्याअनुषंगाने रस्त्यावरील वाहने अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजपर्यंत 2 लक्ष 76 हजार 635 खाजगी वाहने व 15 हजार 214 मालवाहू व प्रवासी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हयातील रस्त्याची स्थिती चांगली असल्याने बहूतांशी रस्ते, महामार्ग सिमेंट काँक्रीटचे बनले आहे.त्यामुळे वाहन चालकाने वाहने अतिवेगाने भरधाव चालविणे,सिटबेल्टचा वापर न करणे,दुचाकी चालकाने हेल्मेट वापरत नसल्यामुळे बहुतांश अपघात होत आहे.

     जिल्हयात 2022 या वर्षात एकूण 324 वाहनांचे अपघात घडले आहे. त्यामध्ये 174 लोक मृत्यूमुखी व 242 गंभिररित्या जखमी झाले.जखमींपैकी अनेकांना कायमचे अपगंत्व आले. अपघात झाल्यानंतर त्यामध्ये कुटूंबातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटूंबावर प्रचंड आर्थिक व मानसिक आघात होतो, त्याची हानी होते, ती कधीच भरुन निघणारी नसते.अपघातामध्ये बऱ्याचदा अन्य वाहन चालकांचासुध्दा दोष असतो.

         जिल्हयात होणाऱ्या अपघातांची व त्याअनुषंगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या व जखमी होणाऱ्यांच्या संख्येत कमी यावी,यासाठी जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रत्यावरील अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात. तरीसुध्दा रस्ता अपघाताच्या संख्येत परिणामकारकरित्या घट झाल्याचे दिसून येत नाही.परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रस्त्यावरील वाहन अपघाताचे प्रमाण मासिक 30 टक्क्यांनी कमी करण्याबाबतचे प्राथमिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.वाहन अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेता,70 टक्के अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे दिसून येते. विशेषकरुन दुचाकीस्वारास अथवा त्याच्या मागील सिटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे.मोटार वाहन कायद्यानुसार नविन दुचाकी वाहन खरेदीदारास वितरकाव्दारे 2 मान्यता प्राप्त कंपनीचे हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिवेगाने वाहन चालविणे,चारचाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट न बांधणे, दारू पिऊन वाहन चालविणे,चुकीच्या किंवा उलट दिशेने वाहन चालविणे,चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे. यामुळे प्रामुख्याने अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.परिवहन विभागातर्फे हेल्मेट,सिटबेल्ट तसेच रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत तसेच त्यामध्ये मृत्यु व जखमी व्यक्तींच्या संख्येत मासिक 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुध्दच्या कारवाईमध्ये वाढ करण्यात येणार आहे.यापुढे 1 मार्च 2023 पासुन संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, वाशिम शहर व जिल्ह्यातील इतर 5 तालुक्यातील मुख्य व इतर सर्व रस्त्यावर दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे.परिवहन विभाग कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून हेल्मेट तपासणीबाबत सध्या सुरू असलेल्या कारवाईपेक्षा कडक कारवाई करण्यात येईल.दुचाकीस्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा.अन्यथा सदर दुचाकी चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंड व अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई करुन त्यास 2 तपास समुपदेशन केल्यानंतर त्याला पुढील प्रवास करु न देता,परत पाठवून हेल्मेट परिधान केल्यानंतरच पुढील प्रवासी प्रवासाची अनुमती देण्यात येईल.

         सर्व दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेटचा वापर कटाक्षाने करुन आपल्या विरुध्दची दंडात्मक कारवाई टाळावी. तसेच पुन्हा घरी परत जावून हेल्मेट परिधान करुन येणे याकरिता लागणारा वेळ व होणारा त्रास आपण वाचवावा. सिटबेल्ट न वापरणे तसेच अतिवेगाने वाहन चालविणे व इतर गुन्ह्याबाबतची कारवाईत वाढ करण्यात येणार आहे. यामागे हेतु जनतेस त्रास देण्याचा नसुन अपघातांची संख्या कमी करणे, मृत्यूमुखी व जखमी होणारे व्यक्तींची संख्या कमी करणे एवढाच आहे. त्यामुळे सर्व जनतेने यामध्ये सहभागी व्हावे व अपघात मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने परिवहन विभाग कार्यालयास सहकार्य करावे.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश