कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श जनजागृती अभियान विविध कार्यक्रमाचे आयोजन


कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत

13 फेब्रुवारीपर्यंत स्पर्श जनजागृती अभियान

विविध कार्यक्रमाचे आयोजन

       वाशिम, दि. 08 (जिमाका) : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथिनिमीत्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी 20२३ या कालावधीत “ स्पर्श " जनजागृती अभियानांतर्गत “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.एस. व्ही. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक मंगरुळपीर तालुक्यातील गायत्री इवरकर, द्वितीय क्रमांक रिसोड तालुक्यातील जयश्री कालापाड व तृतीय क्रमांक मंगरुळपीर तालुक्यातील समृध्दी दिक्षित या विद्यार्थीनीने पटकाविला. विजेत्या विद्यार्थीनींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच रोख पारितोषिक सुध्दा देण्यात आले.

          कुष्ठरोग हा सर्वात जुना आजार आहे. योग्य व पुर्ण औषधोपचाराने १०० टक्के बरा होतो. कुष्ठरुग्णावर समाजाने बहिष्कार न टाकता कुटूंबीयांनी व सर्व नागरिकांनी निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना उपचारासाठी सहकार्य करावे.

          सामाजिक भितीपोटी समाजातील अंधश्रध्देमुळे व शास्त्रोक्त माहीतीच्या अभावामुळे कुष्ठरोगाबाबत सर्वसामान्य लोकामध्ये व समाजामध्ये आजही भेदभाव व बहिष्कृताची भावना दिसते. यामुळे आजही कुष्ठरोगाचा प्रसार आणि उपचाराबद्दल गैरसमज आहे. कुष्ठरोगाविषयी निगडीत कलंक आणि भेदभाव नष्ट करण्याकरीता समाजामध्ये जागरुकता व कुष्ठरोगाबाबत शास्त्रोक्त माहीती व्हावी, याकरीता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ या पंधरवाडयात राज्यात “ स्पर्श जनजागृती अभियान " राबविण्यात येत आहे.

         कुष्ठरोगाशी संबंधित कलंक रुग्णाच्या जीवनाच्या अनेक पैलुवर परीणाम करतात. रोजगाराच्या संधी, वैवाहिक जीवन, कौंटुंबिक जीवन व सामाजिक स्थितीचा कुष्ठरुग्णावर मोठा परीणाम होतो. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात शाळेमध्ये निबंध, वकृत्व, प्रश्नमंजूषा, शालेय विद्यार्थी रॅली, नुक्कड नाटक, कुष्ठरोगाविषयक म्हणी, महिला मंडळ सभा, खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांची कार्यशाळा असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत आहे.

         शरीरावर लालसर फिक्कट पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, हातापायाला सतत मुंग्या येणे, स्नायु कमजोर होणे, तेलकट चकाकणारी त्वचा, चालतांना पायातुन चप्पल निघुन जाणे, डोळे सतत उघडे राहणे आदी लक्षणे कुष्ठरोगाची असु शकतात. अशा लोकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. लवकर निदान व संपुर्ण उपचाराने विनाविकृती रुग्ण ६ ते १२ महिन्यात १०० टक्के बरा होतो. संशयीत लक्षणाकडे दुर्लक्ष आणि अंधश्रध्दा व गैरसमजुतीस बळी पडुन उपचार न केल्यास कुष्ठरोग गंभीर स्वरूप धारण करु शकतो. रुग्णास विकृती येवुन अपंगत्व येवू शकते. त्यामुळे नागरिकांनी वरील लक्षणे दिसुन येताच जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून तपासणी करावी. हा आजार असल्यास पुर्ण उपचार करुन विनाविकृती रोगमुक्त व्हावे. असे आवाहन कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश