महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा १३ ऑक्टोबरला प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा


महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

१३ ऑक्टोबरला प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा

       वाशिम, दि. 04 (जिमाका) : राज्यातील नागरीकांच्या नव संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते १५ ऑगष्ट २०२२ रोजी करण्यात आला. या अंतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन १३ ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य कॉलेज येथे करण्यात आले आहे. यासाठी नवउद्योजक किंवा इत्तर युवक-युवतींना या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होवून संकल्पना सादर करण्यसाठी १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन पध्दतीने पुर्व नाव नोंदणी करता येईल.  

          या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नवउदयोजक तसेच उमेदवारांकरीता वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला या सादरीकरण स्पर्धेत सहभागी होता येईल. कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), ई- प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता, इतर क्षेत्राकरीता पुढील ७ विविध क्षेत्रांत त्यांची संकल्पना सादर करता येईल. सादरीकरण केलेल्या संकल्पनांपैकी सर्वोत्कृष्ट संकल्पनांची निवड जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या ज्युरी समितीमधील तज्ञ सदस्यांकडून करण्यात येईल. यामध्ये जिल्हास्तरावर सर्वोत्तम संकल्पना सादरीकरण करणाऱ्या नवउद्योजकांस प्रथम क्रमांक २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक १० हजार रुपये असे पारितोषिक घोषित करण्यात येणार आहे.

          या घोषित बक्षिसांची रक्कम राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेच्या ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील सादरीकरण स्पर्धेमधील सर्वोत्तम सादरीकरणांपैकी एकूण सर्वोत्कृष्ट १४ संकल्पनांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांचे रोख स्वरुपातील पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविण्यात येणार आहे. इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/ निधी सहाय्य, नाविन्य परिसंस्थेतील संस्थांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स व इतर तत्सम लाभ/ सहाय्य देण्यात येणार आहे.

        तरी जिल्हयातील जास्तीत जास्त व उद्योजकांनी तसेच युवक-युवतींनी जिल्हास्तरीय संकल्पना सादर करण्यासाठी नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अतिष घुगे (९८५०९८३३३५) व दिपक भोळसे (९७६४७९४०३७) यांच्याशी संपर्क साधावा.

        

                                                                                                        *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे