प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे निक्षय मित्र मेळावा संपन्न



प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथे

निक्षय मित्र मेळावा संपन्न

         वाशिम, दि. 19 (जिमाका) : सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी या योजनेंतर्गत क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी, कॅर्पोरेट, लोकप्रतिनिधी, वैयक्तिक व सामाजिक संस्था यांनी क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करून निक्षय मित्र बनता येते.

          राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत हे अभियान सुरु केले आहे. यामध्ये निक्षय मित्र बनवून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना 1 ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविता येतो. जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहकार्य करून प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र बनून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

          19 सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा क्षयरोग केंद्र, वाशिम व रेडक्रॉस सोसायटी वाशिम यांच्या संयुक्त वतीने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निक्षय मित्र मेळावा संपन्न झाला. या निक्षय मित्र मेळाव्याला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ओबेरॉय, डॉ हरीष बाहेती, डॉ. सुनिल गट्टानी, श्री. मारशेटवार, डॉ. सतिश परभणकर, डॉ. काळे, डॉ. वैष्णव, डॉ. कारवा, डॉ. मुंदडा, डॉ. पठाण, श्रीमती रुपाली देशमुख, आ.जे इरफान, व श्री. कुणाल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

          प्राथमिक आरोग्य केंद्र, काटाअंतर्गत उपचार घेत असलेल्या २४ क्षयरुग्णापैकी १७ क्षयरुग्णांना कोरडा आहार, धान्य स्वरूपात सुध्दा तृणधान्य आणि बाजरी, कडधान्ये, भाजीपाला, खाद्यतेल, दूध पावडर, दूध, शेंगदाणे पुरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतिश परभणकर यांनी केले.

          डॉ. कोरे म्हणाले, भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थाचा सहभाग असणे आवश्यक आहे. डॉ. बाहेती यांनी आपल्या जिल्हयातील क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था या कार्यक्रमाला सहकार्य करतील. मॉ गंगा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रुग्णांपर्यंत सहाय्य मिळेल. प्राथमिक आरोग्य केंद्र, काटाप्रमाणे आणखी एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्षयरुग्णांना सहाय्य करू असे त्यांनी सांगितले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग केंद्र येथील जयकुमार सोनुने, जिल्हा समन्वयक श्री. पिंपरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र काटा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. संचालन आरोग्य सेवक कुडलिंक देवळे यांनी तर आभार काटा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे यांनी मानले.

                                                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे