उद्योजकता विकास केंद्राचे मंगरुळपीर येथे 1 ते 9 नोव्हेंबर दरम्यान स्वयंरोजगार प्रशिक्षण



उद्योजकता विकास केंद्राचे मंगरुळपीर येथे

1 ते 9 नोव्हेंबर दरम्यान स्वयंरोजगार प्रशिक्षण

         वाशिम, दि. 18 (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्व. प्रवीण देशमुख बहुउद्देशीय संस्था कवठळ यांच्या संयुक्त वतीने १ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान मंगरुळपीर येथे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे.

        उद्योजकतेचे सुप्त गुण असलेल्या युवक-युवतींना शोधून त्यांच्यामधील सुप्त उद्योजकीय गुणांचा पद्धतशीरपणे आखलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून विकास करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध उद्योगसंधी विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात गृह उद्योग, लघु उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, गाय व म्हैसपालन, कुकुटपालन ईत्यादी याशिवाय उद्योजकता प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधी शोधणे, उद्योग व्यवसायाची उभारणी, उभारणीचे विविध टप्पे, उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध शासकीय कर्ज योजना, कर्ज प्रकरण, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेचे व्यवहार हिशोब लेखे आदीबाबत तज्ञ व्यक्तीकडून व अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे

        किमान ७ वी पास व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करू इच्छिणाऱ्या १८ ते ५० वयोगटातील युवक-युवती व महिलांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी स्व. प्रवीण देशमुख बहुउद्देशीय संस्था, उखळकर बिल्डींग, मानोली रोड, मंगरुळपीर येथील विजय देशमुख (७०८३९४०७६१) व कार्यक्रम आयोजक खुशाल रोकडे, एम.सी.ई.डी. काळे कॉम्प्लेक्स, श्रीकृपा झेरॉक्सच्यावर, जिल्हा उद्योग केंद्रासमोर, काटा रोड, वाशिम येथे ८ नोव्हेंबरपूर्वी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे