१३ ऑक्टोबरला महाराष्ट्र स्टार्टअपचा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणाचे आयोजन



१३ ऑक्टोबरला महाराष्ट्र स्टार्टअपचा दुसरा टप्पा

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणाचे आयोजन

सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

         वाशिम, दि. १२ (जिमाका) : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउदयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्ट-अप यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात १३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय, काटा रोड, वाशिम येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि नागरीकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.  

           नाविन्यता व कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. या अनुषंगाने जिल्हयातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

            जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र- प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उदयोजकतेबाबतची माहिती सत्र, स्थानिक उदयोजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे व नोंदणी केलेल्या नवउदयोजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इत्यादी), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी १० मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून जिल्हास्तरावर ३ पारितोषिक विजेते घोषित केले जातील. प्रथम पारितोषिक - २५ हजार रुपये, व्दितीय पारितोषिक - १५ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक - १० हजार रुपये दिले जाणार आहे.

           राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा व पारितोषिक समारंभ प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम ३ संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीद्वारे अंतिम विजेत्यांची निवड केली जाणार आहे. वरील नमूद ७ क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक १ लक्ष रुपये, व्दितीय पारितोषिक ७५ हजार रुपये व सर्वोत्कृष्ट महीला उद्योजिका यांना १ लक्ष रुपये असे २१ पारितोषिके १७ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे वितरीत करण्यात येणार आहे. या विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर क्रेडीटस, व क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे लाभही पुरविण्यात येणार आहेत.

            महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त विदयार्थी, युवक-युवती व नाविण्यपूर्ण नवउदयोजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रासाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता राजस्थान आर्य महाविद्यालय, काटा रोड, वाशिम याठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कौशल विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०७२५२- २३१४९४ यावर संपर्क करावा. असे जिल्हाधिकारी तथा कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष, षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.
                                                                                                                                       *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश