कारंजा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर दिवाळीपूर्वी दिव्यांगाना जीवनावश्यक साहित्य भेट
- Get link
- X
- Other Apps
कारंजा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
दिवाळीपूर्वी दिव्यांगाना जीवनावश्यक साहित्य भेट
वाशिम, दि. 19 (जिमाका) : 18 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय कारंजा येथे तालुका विधी सेवा समिती व पंचायत समिती कारंजा यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग कुटूंबाना विविध साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत पारवा, कोहर, मनभा, कोळी, गायवळ, सोहळ, किन्ही ( रोकडे ) व तुळजापूर आदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यात आला. निश्चितच या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घेतलेला पुढाकार हा तालुक्याला आदर्श ठरणार आहे. वाटप केलेल्या जीवनावश्यक साहित्यामध्ये किराणा किट, सिलिंग फॅन, वॉटर कॅन, तीनचाकी सायकल आदी सोबतच कायदेविषयक मार्गदर्शन व विविध योजनेची माहिती विविध विभागामार्फत देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश श्री.ठवरे, सहदिवाणी न्यायाधीश श्री. हक, सह दिवाणी न्यायधीश श्रीमती पुंड, नायब तहसीलदार श्री. जाधव, आगार प्रमुख व समाज कल्याण अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
प्रास्तविकातून मार्गदर्शन करतांना ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती गटविकास अधिकारी एस.पी. पडघन यांनी उपस्थित दिव्यांग व्यक्तींना दिली. ज्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग व्यक्तींना 50 टक्के अनुदानामध्ये घर व कर सवलत वैयक्तिक लाभाच्या योजना ज्यामध्ये 75 ते 90 टक्के अनुदानावर संगणक,झेरॉक्स मशीन व तीन चाकी सायकल किंवा कुठलाही उद्योग करण्यासाठी अर्थसहाय्य व पंचायत समितीमार्फत टीन पत्रे घरकुल योजना आर्थिक मदत इत्यादीबाबत लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी वर्गामध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींना मोफत वसतीगृह सुविधा,शालेय पुस्तकासाठी अनुदान व शिष्यवृत्ती इत्यादी बाबींचा लाभ तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामार्फत दिव्यांगाना 75 टक्के सवलत त्याच्यासोबत मदतीला जो व्यक्ती असतो त्याला 50 टक्के सवलत,अपघात झाल्यास आर्थिक मदत,शाळा शिकत असल्यास मुला-मुलींना शालेय पास इत्यादी बाबीची माहिती दिली.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देऊन दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या प्रवाहामध्ये अन्याय न करता सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगून श्री. पडघन म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हे समाजाचाच घटक आहे. साने गुरुजी यांनी आपल्या प्रार्थनेमध्ये अतिशय मार्मिक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यामध्ये ते असे म्हणाले की, मानवाचा धर्म कोणता आहे ते एवढेच सांगतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीचे आरती विकलं तयाला गांजिती सकल तयाला जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. असा हा आपला धर्म असल्यामुळे मानवा. मानवामध्ये भेद करण्याचे मुळीच कारण नाही. त्यामुळे आपणसुद्धा जे दिव्यांग व्यक्ती आहे ते आपल्या समाजाचाच घटक आहे,त्यांना कुठल्याही प्रकारे हिन दर्जाची वागणूक आपणाकडून दिल्या जाऊ नये. या पद्धतीने समाजाचे वर्तन असणे आवश्यक आहे.आपण सर्व मिळून या लोकांसाठी जर काम केले तर निश्चितच त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी मदत होईल. दिव्यांगाच्या जीवनामध्ये प्रकाश पडेल. असे मत श्री. पडघन यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना, न्यायाधीश श्री ठवरे म्हणाले,आपण या दिव्यांग व्यक्तींना समाजाचा एक भाग समजून यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला पाहिजे. जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आजच्या या दिव्यांग मार्गदर्शन शिबिराच्या अनुषंगाने आपणाला विविध विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली असून जे लाभधारक आहे, त्यांना वाटत असेल की मी या योजनेकरीता पात्र आहे. त्यांनी त्या त्या विभागाशी संपर्क करून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. मला निश्चितच खात्री आहे की, आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असून याचा आपण लाभ घेतला पाहिजे. आज आपण इथे उपस्थित झाल्यानंतर या योजनेची माहिती मिळाली परंतू जे लाभार्थी अजूनही गावाकडे आहेत त्यांना सुद्धा या योजनेच्या अनुषंगाने आपण मार्गदर्शन केले तर निश्चित त्यांनाही सुद्धा लाभ मिळू शकेल. या मेळाव्यात ज्या विभागांनी योजनेच्या माहितीबाबत संबंधितांना अवगत केले, त्या त्या विभागांनी येणाऱ्या पुढील काळात प्रत्यक्ष त्यांना लाभ देऊन त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच आणि दिव्यांग व्यक्तींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती अधिकारी/ कर्मचारी, सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment