लेखाधिकारी युसूफ शेख ठरले “लोहपुरुष”शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही कर्तबगारी



लेखाधिकारी युसूफ शेख ठरले लोहपुरुष

शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही कर्तबगारी

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद जोपासण्याची आवड असते. परंतू प्रत्येक जणच कायम तो छंद जोपासतोच असे नाही. परंतू शासकीय सेवेत आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या वेळीच पार पाडून अनेक विषयात पदव्या प्राप्त करुन आपला छंद कायम जोपासून त्या क्षेत्रात नावलौकीक करणारे फारच थोडे असतात. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परिक्षण शाखेत लेखाधिकारी असलेले युसूफ शेख यांनी केवळ छंदच जोपासला नाही तर विविध स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीसेही पटकावली आहे. 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित लोहपुरुष स्पर्धेत युसूफ शेख यांनी स्विमींग, रनिंग आणि सायकलींग स्पर्धेत सहभागी होऊन या तीनही स्पर्धा 8 तास 46 मिनीटात पुर्ण करुन त्यांना लोहपुरुष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे या स्पर्धेतील यश बघता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.

            वाशिमपासून दक्षिणेकडे 10 कि.मी. अंतरावर असलेले मोहगव्हाण हे युसूफ शेख यांचे गाव. बालपणापासून युसूफ यांना शिक्षणाची ओढ. सोबतच त्यांना स्विमींग व सायकलींक करण्याची आवड होती. प्राथमिक शिक्षण घेतांना त्यांना गावाजवळील नाला ओलांडून पैल तिरावरील पंचाळा या गावात प्राथमिक शिक्षण घ्यायला जावे लागायचे. पावसाळयात नाल्याला येणाऱ्या पुरातून ते शिक्षणासाठी त्या गावी जायचे. पण कधी शिक्षणात त्यांनी खंड पडू दिला नाही. गाव शेजारी नाल्याला भरपूर पाणी असल्यामुळे बाल वयातच ते पोहणे शिकले. गावात व शेजारच्या गावात उच्च प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इयत्ता 8 वी ला वाशिम येथील श्री. बाकलीवाल विद्यालयात प्रवेश घेतला. दररोज वाशिमला 10 कि.मी. येणे आणि परत गावी जाणे हा नित्यक्रम त्यांनी राजस्थान आर्य महाविद्यालयाला पदवीपर्यंत जवळपास 8 वर्ष सायकलने वाशिम येथील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची शिक्षणाची जिद्द देखील खेळाप्रमाणेच कायम राहीली.

           अकोला येथून एम.कॉम तर अमरावती विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र), टिळक महाराष्ट्र, पुणे विद्यापिठातून दुरस्थ शिक्षणातून एम.ए. (राज्यशास्त्र) आणि मास्टर ऑफ जर्नालिझम ही पदयुत्तर पदवी चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली. एवढेच नव्हे तर त्यांनी वरील चारही विषयात राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा उत्तीर्ण केली. वाणिज्य आणि राज्यशास्त्रात राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली. पुढे कायदयाची एल.एल.बी. पदवी सुध्दा प्राप्त केली. सध्या युसूफ शेख यांचे वाणिज्य शास्त्रामध्ये पी.एच.डी. चे संशोधन सुरु आहे. ग्रामीण भागात राहून त्यांनी शिक्षणाची घोडदौड सुरुच ठेवली आहे.

           नागपूर व मुंबई येथील राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 2005-06 मध्ये आणि 2007 मध्ये पुणे येथील विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात शिष्यवृत्ती घेऊन अभ्यास केला. सन 2008 मध्ये सहकार विभागात कोल्हापूर येथे लेखा परीक्षक म्हणून शासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर 2009 मध्ये राज्य सेवेतून वित्त्‍ा व लेखा विभागात पुन्हा निवड झाल्यानंतर 2011 मध्ये कोल्हापूर कोषागार कार्यालय येथे अपर कोषागार अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले. सन 2012-15 या कालावधीत वाशिम येथे जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, सन 2015-18 मध्ये यवतमाळ येथे अपर कोषागार अधिकारी म्हणून तर ऑक्टोबर 2018 पासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथील अंतर्गत लेखा परीक्षण शाखेत लेखाधिकारी म्हणून श्री. शेख काम करीत आहे.

           शिक्षणात उत्तम कामगीरी करणाऱ्या युसूफ शेख यांनी शासकीय नोकरी करतांना आपले सायकलींग, रनिंग व स्विमींग हे छंद देखील उत्तम प्रकारे जोपासले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सायकलींग, रनिंग व स्विमींग यामध्ये खंड पडू न देता सुरुच ठेवले. आंतरराष्ट्रीय दर्जाची बी.आर.एम. ही सायकलींग क्षेत्राशी संबंधित सुपर रॅनोडिअर्स स्पर्धा दिड वर्षात नोव्हेंबर 2020 ते मार्च 2022 या कालावधीत पुर्ण केली. यामध्ये त्यांनी वाशिम-धनज (बु.) व परत वाशिम-200 कि.मी, वाशिम-नांदगांव (पेठ) व परत वाशिम- 300 कि.मी., वाशिम-मोर्शी व परत वाशिम-400 कि.मी. आणि वाशिम-पांढुर्णा (मध्यप्रदेश)-सावनेर (नागपूर) परत वाशिम 600 कि.मी. अशी एकत्रित सायकलींग पुर्ण केली. 3 वेळा सुपर रॅनोडिअर्स स्पर्धा पुर्ण करणारे युसूफ शेख हे जिल्हयातील पहिले व्यक्ती ठरले.

             कोल्हापूर येथील कोल्हापूर स्पोर्ट क्लबच्या वतीने 2 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित स्पर्धेत 650 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत युसूफ शेख यांनी सहभाग घेवून 1900 मिटर स्विमींग, 90 कि.मी. सायकलींग आणि 21 कि.मी. रनिंग या तीनही खेळ प्रकारात एकत्रित 8 तास 46 मिनीटाचा अवधी घेतला. यामध्ये स्विमींगसाठी 45 मिनीटे, सायकलींगसाठी 4 तास 25 मिनीटे आणि रनिंगसाठी 3 तास 15 मिनीटे लागली. युसूफ शेख यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असून लेखाविषयक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून अमरावती येथील शासकीय प्रबोधिनी, कुंडल फॉरेस्ट ॲकॅडमी, सांगली येथे व इतरांनी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम ते करतात. घरी शैक्षणिक पार्श्वभूमि नसतांना देखील जिद्द आणि चिकाटीने श्री. शेख यांनी विविध विषयात पदव्युत्तर पदवी, कायदयाची पदवी घेतली असून सध्या पी.एच.डी. सुरु आहे. तेवढाच छंद त्यांनी सायकलींग, रनिंग व स्विमींगमध्ये जोपासून त्यामध्ये सुध्दा यश संपादन करुन युवा वर्गासोबतच शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

            शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांसाठी युसूफ शेख यांना अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, हैद्राबाद येथे केंद्र सरकारच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयाचे क्षेत्रिय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे तसेच क्रीडा क्षेत्रासाठी अकोला येथील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. पराग टापरे, डॉ. राजेंद्र सोनोने, कोल्हापूर येथील सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड, वाशिम येथील चेतन शर्मा व पवन शर्मा तसेच अन्य मित्र मंडळींचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. युसूफ शेख यांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.       

                                                                                                                                     *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे