गावाच्या समस्या प्राधान्याने सोडवू पालकमंत्री संजय राठोड आसोला (खुर्द) येथे नागरी सत्कार

गावाच्या समस्या प्राधान्याने सोडवू    
               पालकमंत्री संजय राठोड
 
आसोला (खुर्द) येथे नागरी सत्कार 

वाशिम दि.९(जिमाका) समाजसेवेसाठी आपण राजकारणात आलो आहे.कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांची कामे आपल्याकडून केली जातात. गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले पाहिजे याच भावनेतून कामे केली जातात.आसोला (खुर्द) ग्रामस्थांच्या घरकुल,रस्त्यांच्या, पुलाच्या,पाणीपुरवठा व अन्य समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. 
         आज ९ ऑक्टोबर रोजी मानोरा तालुक्यातील आसोला (खुर्द) येथील सोहंमनाथ महाराज संस्थानात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री श्री राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला.या सत्काराला उत्तर देताना श्री. राठोड बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महेश चव्हाण, कबीरदास महाराज,उत्तमराव ठवकर,पंचायत समिती सदस्य अभिषेक चव्हाण, माजी सभापती प्रेम राठोड व सुहास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री राठोड म्हणाले,अन्यायाच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून काम करतो.मागील २५ वर्षापासून आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत आहे.मोलमजुरी करणारी व्यक्ती उपचारासाठी जेव्हा सरकारी दवाखान्यात येते,तेव्हा त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य समजून मी काम करतो.पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील.केवळ रस्ते व इमारती म्हणजेच विकास नव्हे तर घरोघरी समृद्धी आली तरच विकास होईल.येणाऱ्या काळात प्रशासनाला सोबत घेऊन जिल्ह्यात विकास कामे करण्यात येतील.सार्वजनिक आणि वैयक्तिक अडचणी देखील सोडविण्यात येतील.लोकसेवक म्हणून निश्चित चांगले काम केले जाईल. जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासोबतच कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           डॉ चव्हाण म्हणाले,या भागात रोजगाराचा प्रश्न आहे.बंजारा समाजातील महिला कमी शिकल्या असल्यामुळे त्या कष्टाची कामे करतात.त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते.त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांना योग्य उपचार मिळत नाही. प्रसंगी काहींचा मृत्यू होतो.त्यामुळे महिलांच्या आरोग्यासोबतच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.या भागातील युवा वर्गाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       प्रारंभी पालकमंत्री श्री. राठोड यांचा श्री सोहमनाथ महाराज विश्वस्त मंडळ,ग्रामपंचायत आजी माजी सदस्य गण,सेवा सहकारी सोसायटी आजी-माजी सदस्य गण व शाळा व्यवस्थापन समिती आसोला(खुर्द) यांच्या वतीने देखील शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत राठोड यांनी केले.कार्यक्रमाला आसोला(खुर्द) ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*मानोरा अर्बन निधीचे उद्घाटन*

 मानोरा येथे मानोरा अर्बन निधी शाखेचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.महेश चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष हेमंत ठाकरे,महंत कबीरदास महाराज,नाना पोहेकर,नाजूक धांदे,सुरेश ठेंगरी, राजेंद्र म्हातारमारे,कन्हैया गोरे,वनिता मिसळे व संदीप भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री राठोड म्हणाले,अर्बन निधी शाखेच्या माध्यमातून मानोरा तालुक्यातील नागरिकांना सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.रिझर्व बँकेच्या निकषानुसार ही शाखा सुरू करण्यात आली आहे.खाजगी पतसंस्था व बँकांमध्ये आर्थिक व्यवहार करताना लोक मागे पुढे बघतात.या निधी शाखेने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. विश्वासाच्या बळावर निधी शाखेचा विस्तार झाला पाहिजे.विश्वास संपादन करून तालुक्यातील लोकांची चांगली सेवा करावी.पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच दिशा देऊन शेतकरी व शेतमजुरांच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील,असे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी मानोरा अर्बन निधी शाखेचे पालकमंत्री संजय राठोड यांनी फित कापून उद्घाटन केले.कार्यक्रमाला निधी शाखेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मानोरा शहरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार दिपाली गंधेवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे