बोलीभाषेतूनच वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास -मोहन शिरसाट



बोलीभाषेतूनच वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास                                                       

 -मोहन शिरसाट

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

         वाशिम, दि. 14 (जिमाका) : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जयंतीनिमित्त आज १४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी आमची मायबोली या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सुनील घोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक साहित्यिक मोहन शिरसाट यांची उपस्थिती होती.

       यावेळी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यावेळी म्हणाले, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर वाचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध प्रकारची पुस्तके, संदर्भग्रंथ, कादंबरी वाचन करणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसोबतच इतर भाषांवर प्रभुत्व मिळविणे ही आता काळाची गरज बनली आहे. तेव्हाच आपण समृध्द होऊ असे ते यावेळी म्हणाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज व कवीयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही ओळी श्री.भगत यांनी सादर केल्या. 

        श्रीमती सुवर्णा सुर्वे यांनी मानवी जीवनात मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

    श्री.उगले यांनी भाषा ही मानवी जीवन समृद्ध करते. भाषा ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे. त्यासाठी वाचन केले पाहिजे. जर भाषा समृध्द झाली तरच जीवन समृद्ध होईल असेही ते यावेळी म्हणाले.

    परिक्षक श्री. शिरसाट म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक समाज सुधारक व संत महात्म्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. मराठी भाषेचा आपण गौरव केला पाहिजे. यावेळी त्यांनी डॉ.कलाम यांची दशसुत्री उपस्थितांना सांगितली. प्रशासनात काम करतांना अनेक नागरिक तुम्हाला कामानिमित्त भेटायला येतात. जर नागरिक तुमच्याशी बोली भाषेत बोलत असेल तर तुम्ही त्यांच्याशी सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. बोली भाषेचा स्वाभिमानाने वापर करा. ज्ञानसंपन्न व्यक्तीमत्व विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार होणे गरजेचे आहे. असे श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी श्रीमती निशा मुळावकर यांनी कणा ही कविता सादर केली. श्री.घोडे यांनी वाचन प्रेरणा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी परीक्षकांनी वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार शाहू भगत यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे