वाशिमला उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार



वाशिमला उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार

 

·        9 जूनला दिल्ली येथे श्रीमती बजाज होणार सन्मानीत

वाशिम, दि. 07 (जिमाका) : जिल्हयातील युवक-युवतींना विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमने तयार केलेला आराखडा केंद्र सरकारच्या उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे. येत्या 9 जून रोजी नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात केंद्रिय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी सन 2020-21 पुरस्कार स्पर्धा केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने घेण्याल आली होती. यामध्ये वाशिमसह देशातील 336 जिल्हयांनी सहभाग घेवून आराखडा सादर केला होता. त्यामधून प्राथमिक स्तरावर 30 जिल्हयांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातून वाशिमसह इतर काही जिल्हयांचा समावेश होता. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी समितीसमोर ऑनलाईन सादरीकरण केले.

कोविड-19 च्या साथीमुळे आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव दूर करण्यासाठी सन 2020-21 च्या आराखडयात विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कस्टमाईज क्रॅश कोर्स फॉर कोविड वॉरिअर्स अंतर्गत ॲडव्हान्स ॲन्ड बेसिक हेल्थ केअर सपोर्ट, जनरल डयुटी असिस्टंट व ऑक्सीजन प्लँट मेंटेनन्सचे प्रशिक्षण देण्यात आले. कोविड काळात युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या 93 उमेदवारांना कर्ज वितरीत करण्यात आले. प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हयातील मनुष्यबळाची मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य आधारीत प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. जिल्हयाचा वार्षिक कृती आराखडा हा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्श्नात तयार करण्यात येतो.         

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे