वृक्ष लावुया..वृक्ष जगवुया…पर्यावरणाचा समतोल राखुया ” असा संकल्प मनी धरुया..

*लेख*

“ वृक्ष लावुया..वृक्ष जगवुया…
पर्यावरणाचा समतोल राखुया ”   
असा  संकल्प मनी धरुया..

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ..वनचरे”  या  अभंगाच्या माध्यमातुन  विश्व  आराध्य  संतश्रेष्ठ श्री तुकाराम  महाराज यांनी मानवी जीवनातील  वृक्षांची  महती सांगीतली आहे. वन व्यवस्थापन करणे ही आता जणु  काळाची गरजच बनत चालली आहे, असे म्हटल्यास आता वावगे ठरणार  नाही. कारण वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन ही महत्वाची जबाबदारी   आपणावर येऊन ठेपली आहे. सततचा दुष्काळामुळे निर्माण झालेल्या कमालीच्या पाणी टंचाईमुळे मनुष्य जीवनासोबत प्राणी जीवनसुद्धा हतबल होत चालले आहे. याची जाणीव सुध्दा आपणास आहे. 

जागतिकीकरणाचा केवळ  गाजावाजा व बोलबाला करुन विविध कारणांसाठी मोठया प्रमाणात  वृक्षतोड आज मोठया प्रमाणात केली  जात आहे. या कारणांमुळे  जागतिक तापमान वाढ( global  warming ) ही समस्या प्रामुख्याने तोंड वर काढत असल्याचे आपण पाहतो आहे. त्याचा  विपरीत परीणाम अप्रत्यक्षरीत्या मानवी जीवनावर होत आहे. पावसाची अनियमितता ही त्याची  प्रारंभीक पायरी होय.  

त्यासाठी  वृक्षारोपण व  वृक्षसंवर्धन व्हावे ही माफक अपेक्षा आज प्रत्येक   व्यक्तींकडुन, सामाजिक  संस्थेकडुन  केली  जात आहे. किंबहुना त्यासाठी  अनेक संघटना प्रत्यक्ष व  अप्रत्यक्ष  कार्य  करत असल्याचे आपण  पाहतो  आहे. त्याचबरोबर अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर  व वृक्ष न तोडण्याचे   आवाहनही  विविध  माध्यमातुन  आज  होत आहेच.परंतु त्याचे  अनुकरण  प्रथमत: स्वत:पासुन मात्र होतांना  दिसत  नाही. भरमसाठ  वृक्षतोडीमुळे  कार्बन  उत्सर्जनात  झालेली  प्रचंड  वाढ  व जमिनीची  होणारी  वाढती धुप यामुळे  निसर्गचक्रात बदल झाल्याचा विविध  घटनांचा कानोसा घेतांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण  घेतोच आहोत  यात दूमत  नाही. 

वृक्ष  लागवडीचे  महत्व  आज  ठळकपणे समोर  येत आहे. शाश्वत  जीवनाचा  विचार  करुनच पर्यावरणपुरक  धोरण  जपतांना  वृक्ष संपत्ती बद्दल पुरेशी जागरुकता  असणे गरजेची बाब आहे. वृक्ष वल्लरी  हे आपले  आप्त स्वकीयच आहेत. झाडांपासुन आपल्या मुलभुत गरजा  पूर्ण  होतात. वृक्षांचे अस्तीत्व जर  या  पृथ्वी  तलावर  नसेल तर  सजीव  सृष्टी जीवंत राहु  शकणार  नाही. किंबहूना  फार काळ  जगु  शकणार  नाही.  

सध्या  आपल्या  राज्यात  20.10 टक्के  इतके  वनक्षेत्र  आहे. त्यामध्ये  वाढ होणे हे अत्यंत गरजेचे आहे.वृक्ष ही  भुतलावरील  सर्वात  मौल्यवान  असी निसर्गाची देणगी आहे.त्यासाठी  पर्यावरणाचा  समतोल  राखण्यासाठी  एकुण  भुभागाच्या 33 टक्के  भुभागावर  वनसंपदा  असणे आवश्यक आहे, त्यासाठी बेछुट वृक्ष तोड  थांबवायला हवी.   

एक चित्ताने विचार केल्यास निसर्गाचे  आपणावर अनंत असे उपकार  आहेत. त्यामुळे  आनंददायी व निकोप  जीवन  जगण्यासाठी  पर्यावरणाचा ऱ्हास  न  करता  वनसंपदांचं  जतन   करणे ही  मुख्य भूमिका  बजावणे  आपले आद्य कर्तव्यच  समजले  पाहीजे. 

वृक्ष  आपल्याला  फक्त  पाने, फुले, फळेच देत नाहीत  तर  आपल्याला कोणत्याही  परीस्थीतीत  जगण्याची  नवी  उमेद, तसेच  सकारात्मक  उर्जा  बहाल  करतात. वृक्ष आणि  मानवी  जीवनाचं  नातं  निकटचं  आहे. वृक्षांमुळेच आपण आहोत ही भावना  आपण जपायला  हवी, त्यासाठी  वृक्षांचे  संवर्धन  करुन  वृक्ष  जगवायला  हवीत.   

भगवान  गौतम  बुध्द  यांनी  याच  वृक्षाखाली  बसुन  ज्ञान प्राप्त केले . तसेच अनेक ऋषीमुनींनी  याच  वृक्षांच्या  सानीध्यात आपले जीवन  व्यतीत करुन ज्ञान साधना  प्राप्त केली . यावरुन  वृक्षांचे  महत्व किती  अनन्य साधारण आहे याची प्रचिती  आपणास या उदाहरणावरुन येईल.  

दिलं  ते  जपायचं,आणि आपणही  देणाऱ्याला काही  तरी  अर्पण  करायचं  अशी आपली  मानवी  संस्कृती होय, त्याप्रमाणेच  निसर्गाने  दिलेले पर्यावरण आपण सुव्यवस्थीत  राखले  पाहीजे. 

वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा ऑक्सिजन आपल्याला देतात.

चला तर मग,आपल्या स्व: हितासाठी,   निकोप नव जीवनासाठी वृक्षारोपण  करुया, वृक्षसंवर्धन  करुया व  उज्जवल भविष्यासाठी  वाटचाल  करुया ! आणि  वृक्षारोपणाचा  स्वयंसकल्प सिध्दीस  नेवुया … 

अनिल कुरकुटे 
जिल्हा माहिती कार्यालय 
वाशिम
९८२२४८२२९०

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे