बीबीएफ/सरी वरंभा/ बेडवर सोयाबीनची टोकण पध्दतीने लागवड करुन सोयाबीनच्या उत्पन्नात वाढ करा कृषी विभागाचे आवाहन



बीबीएफ/सरी वरंभा/ बेडवर सोयाबीनची

टोकण पध्दतीने लागवड करुन सोयाबीनच्या उत्पन्नात वाढ करा

कृषी विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 08 (जिमाका) : वाशिम जिल्हा हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखला जातो. मागील 25 वर्षापासून जिल्हयात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून सोयाबीन घेतले जाते. या पिकावरच जिल्हयातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. यंदाच्या खरीप क्षेत्राच्या 75 टक्के क्षेत्रावर म्हणजेच 3 लाख 7 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. सोयाबीन हे पीक ज्या भागात 700 ते 1000 मिलीमिटर पाऊस पडतो अशा ठिकाणी लागवडीस योग्य आहे. जिल्हयाचा विचार करता मागील वर्षी 1176 मिलीमिटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, सतत पाऊस व पावसाची तिव्रता या कारणाने ह्या पीकात पाणी साचते. त्यामुळे उत्पन्नात घट येत आहे. सोयाबीन पीक अति पावसास संवेदनशील असल्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यास मोठया प्रमाणात घट येते.

बहुतांश शेतकरी बहुपीक पेरणी यंत्राने पेरणी करतात. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचते, पिकाचा साचलेल्या पावसाच्या पाण्याशी संपर्क येतो. याचा परिणाम शेतामध्ये विविध बुरशीची वाढ होऊन पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पिकाच्या सर्वसाधारण वाढीवर परिणाम होतो. काही शेतकरी पाणबसन/ चिभडलेल्या जमिनीत या पिकाची पेरणी करतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे पेरणीची पध्दत बदलणे हाच ठरु शकतो.

शेतकऱ्यांनी पेरणी करतांना ट्रॅक्टर चलित बीबीएफ प्लॅटरने किंवा बैलजोडी, ट्रॅक्टरव्दारे सरी वरंभे पाडून बेड तयार करुन वरंभ्यावर/बेडवर सोयाबीनची टोकण पध्दतीने लागवड केल्यास पावसाचे पाणी सरीमध्ये मुरुन अतिरीक्त पाणी शेतीबाहेर निघून जाईल. सोयाबीन पिकाची वाढ चांगली होण्याकरीता पुरेसा सुर्यप्रकाश व हवा मिळत असल्यामुळे पीक रोग व किडीस कमी प्रमाणात बडी पडतो. तसेच फवारणी करण्याकरीता सरीचा वापर करता येत असल्यामुळे फवारणी करणे सोयीचे होते. सरीमध्ये पावसाचे पाणी मुरल्यामुळे पावसात खंड पडला तरी उपलब्ध ओलाव्यावर पिक तग धरु शकते. योग्य अंतरावर टोकण पध्दतीने लागवड केल्यामुळे झाडांची मर्यादित संख्या राखता येते. त्यामुळे एकरी 16 किलो बियाणांची म्हणजेच आजच्या बाजार भावानुसार प्रति एकरी 2240 रुपयांची बचत होते.

सरी वरंभ्यावर टोकण केलेल्या सोयाबीनचे एकरी 28 क्विंटल उत्पादन घेतलेले शेतकरी सांगली जिल्हयात आहे. आपल्या मालेगांव तालुक्यातील बोल्ही गावचे प्रगतीशील शेतकरी सय्यद शारीक सय्यद गफुर यांनी मागील वर्षी सोयाबीन केडीएस 726 या वाणाची सरी वरंभ्यावर लागवड करुन एकरी 18 क्विंटल उत्पादन घेतले आहे. जिल्हयाची मागील वर्षाची सरासरी सोयाबीन उत्पादकता 6 क्विंटल 56 किलो प्रति एकर असून या उत्पादकतेत वाढ करण्याकरीता सोयाबीन पिकाची लागवड सरी वरंभ्यावर करुन पिक पावसापासून वाचविणे हा एकमेव पर्याय ठरु शकतो.

या खरीप हंगामात जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेताच्या परिस्थीतीनुसार बीबीएफ/सरी वरंभा/बेडवर यापैकी कोणत्याही एका पध्दतीने सोयाबीनची लागवड करावी. या पध्दतीचा जिल्हयातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी अवलंब करावा. कृषी विभाग यासाठी मागील तीन वर्षापासून प्रयत्न करीत आहे. बहुतांश प्रगतीशिल शेतकऱ्यांनी या पध्दतीचा वापर अवलंबिल्यामुळे प्रति एकरी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची खरीपापुर्वीची मशागतीची कामे जवळपास पुर्ण होत आली असून जमीन पेरणीसाठी तयार करीत असतांना जे शेतकरी बीबीएफव्दारे पेरणी करणार नाही अशा शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सरी वरंभा अथवा बेड तयार करुन घ्यावे. सऱ्या पाडण्यापूर्वी एकरी दोन बॅग दाणेदार सिंगल सुपर फॉस्पेट जमिनीत मिसळून दयावे. 75 ते 100 मिलीमिटर पाऊस पडल्यानंतर टोकणयंत्र किंवा मजूराच्या सहाय्याने टोकण करावे.

विविध पेरणीच्या पध्दती वापरुन पेरणी केल्यास उत्पादन व उत्पन्नात होणारी अंदाजे वाढ आंतरपीक सोयाबीन व तूर याचा समावेश करुन पुढीलप्रमाणे करता येईल. बैलजोडीव्दारे पेरणी केल्यास अंदाजे उत्पादन खर्च एकरी 22 हजार 644 रुपये तर अंदाजे उत्पन्न एकरी 10 क्विंटल व एकरी उत्पन्न 41 हजार 100 रुपयांचे होऊन निवळ नफा एकरी 18 हजार 456 रुपयांचा मिळतो, बहुपिक पेरणी यंत्राव्दारे पेरणी केल्यास अंदाजे उत्पादन खर्च एकरी 20 हजार 748 रुपये, अंदाजे उत्पन्न एकरी 10 क्विंटल उत्पन्न एकरी 41 हजार 100 रुपये व यातून मिळणारा निव्वळ नफा एकरी 20 हजार 352 रुपये येतो. ट्रॅक्टर चलित बीबीएफव्दारे पेरणी केल्यास अंदाजे उत्पादन खर्च एकरी 20 हजार 588 रुपये, अंदाजे उत्पादन एकरी 12 क्विंटल, उत्पन्न एकरी 49 हजार रुपयांचे यातून निव्वळ नफा एकरी 28 हजार 412 मिळतो. सरी वरंभ्यावर टोकण पध्दतीने लागवड केल्यास अंदाजे उत्पादन खर्च एकरी 23 हजार 217 रुपये, अंदाजे उत्पन्न 14 क्विंटल प्रति एकर व यातून मिळणारे उत्पन्न एकरी 56 हजार 900 रुपये तर यामधून मिळणारा निव्वळ नफा एकरी 33 हजार 683 रुपये येतो आणि अमरपट्टा पध्दतीने सोयाबीन व तूर पिकाची लागवड केल्यास यामध्ये सोयाबीन अधिक तूर यात सोयाबीनचे चार तास आणि तुरीचे एक तास याचा समावेश आहे. अमरपट्टयासाठी अंदाजे उत्पादन खर्च एकरी 25 हजार 524 रुपये अंदाजे उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति एकर आणि यामधून मिळणारे उत्पन्न एकरी 1 लाख 16 हजार 700 रुपये तर यातून मिळणारा निव्वळ नफा एकरी 91 हजार 176 रुपये इतका मिळतो. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. जिल्हयात सोयाबीन व तूर पिकाच्या पेरणीसाठी सरी वरंभा किंवा अमरपट्टा पध्दतीने लागवड करुन शेतीची उत्पादकता वाढवावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.                

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे