'२१ जून' ‘जागतिक योग दिन’ करा 'योग' रहा नि'रोग'..

लेख

'२१ जून' ‘जागतिक योग दिन’

करा 'योग' रहा नि'रोग'..

     श्रीमद्‌ भगवद्‌गीतेमध्ये "योगः कर्मसु कौशलम्‌, पतंजलीनी योगः चित्तवृत्ती निरोधः' अशी योगाची व्याख्या केली आहे. या योगशास्त्राच्या व्याख्या असे सांगतात, की आपल्या कामातील कार्यातील कौशल्य, कुशलता म्हणजे योग. चित्तवृत्तींवर शाश्‍वत जीवनाच्या मार्गावर योग आपणाला घेऊन जातो. जीवनाची बाल्यावस्था, प्रौढ किंवा वृद्धावस्था या तीनही स्तरावर योग आपणाला अतिशय उपयुक्त ठरतो, हे प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
    योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.

        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.या कार्यक्रमात दोन 'जागतिक रेकॉर्ड’ झाले. ३५,९८५ लोकांचा सहभाग असणारा सर्वांत मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात ८४ वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक रेकॉर्ड बनले.

      २१ जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशीरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

      योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु, तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहित होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते.  योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली आहे.

       जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते. त्यामध्ये योगासने, शुद्धिक्रिया, प्राणायाम अशा अनेक योगसंबंधित क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योग-तत्त्वज्ञान, योगाचे प्राचीन ग्रंथ, योगातील साधना, योगचिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांकरिता सामूहिक स्वरूपात सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

      सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन २०२० मध्ये आलेल्या कोविड साथीमुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील अधिक धोक्यात आल्याचे आपण अनुभवले. या काळात असंख्य लोक  इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येऊन योगसाधना करतांना दिसले. सन २०२० व २०२१ मध्ये ज्याठिकाणी कोविड साथीमुळे लोकांना एकत्र येऊन योगसाधना करणे शक्य नाही, अशा ठिकाणी गुगल मीट व झूम अँपच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला.
     निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे शुगर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. अनेकदा लोकांना असे वाटते की योगा केवळ शरीर लवचिक बनवण्यासाठी केला जातो, पण तसे नाही. योगाची अनेक आसने आहेत, ज्यांचे अनेक फायदे आहेत. योगाच्या मदतीने तुम्ही  सुदृढ आणि निरोगी राहू शकतो. अनेकदा लोक योगाला संथ माध्यम मानतात, पण तसे नाही. योग तुम्हाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करू शकतो. जाणून घ्या योगाचे काय फायदे आहेत

मन शांत राहील : योग हा स्नायूंसाठी चांगला व्यायाम आहे, परंतु वैद्यकीय संशोधनाने सिद्ध केले आहे की योग शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या वरदान आहे. योगामुळे तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते, भूक चांगली लागते, एवढेच नाही तर पचनक्रियाही बरोबर होते.

शरीर आणि मनाचा व्यायाम : जिममध्ये गेलात तर शरीर निरोगी राहते, पण मनाचे काय. दुसरीकडे, जर तुम्ही योगाची मदत घेतली तर ते तुमचे शरीर तसेच मन आणि मन निरोगी करेल.

आजारांपासून मुक्ती : योगासने करून आजारांपासून मुक्ती मिळू शकते. योगामुळे रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. योगामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते.

वजन नियंत्रण : योगामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त होते, दुसरीकडे योगाद्वारे शरिीरातील चरबीही कमी करता येते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते : योगासने, तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी योगासन खूप फायदेशीर आहे. योगामुळे ए कोलेस्ट्रॉलही कमी होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नैराश्यातून मुक्ती : योगाभ्यास केल्याने नैराश्यापासुन मुक्ती मिळुन आनंदी जीवन जगू शकतो हे सिद्ध झाले आहे.
      आपला देह निश्चल असेल, निष्प्राण असेल, अचेतन असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्या देहाला गरज आहे चैतन्याची. ते चैतन्य मिळते योगसाधनेतून! जोवर आपला स्वतःशी परिचय होत नाही, तोवर आपण जगाशी सख्य जोडूनही एकटेच राहतो. म्हणून स्वतःशी मैत्री करायची असेल, तर योगसाधनेला पर्याय नाही. म्हणून केवळ आजच्या दिवसापुरती योग साधना न करता आजपासून योग साधनेला प्रारंभ करा आणि ती दैनंदिन आयुष्यातील एक सवय बनवून घ्या. जेवण, झोप यांच्याइतकेच योगाभ्यासाचा महत्त्व द्या. शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल.यासाठी आजपासून योगाभ्यासाची आवड आणि सवडीने सवय लावून घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा! जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा !

- अनिल कुरकुटे
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम.
९८२२४८२२९०

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे