जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला खरीप पिक कर्ज वाटपाचा आढावा14 जूनपर्यंत 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटीचे पिक कर्ज वाटप



जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

खरीप पिक कर्ज वाटपाचा आढावा

14 जूनपर्यंत 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटीचे पिक कर्ज वाटप


        वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 15 जून रोजी वाकाटक सभागृहात सन 2022-23 या वर्षातील 14 जूनपर्यंत वाटप करण्यात आलेल्या खरीप पिक कर्जाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले, यंदा पाऊस थोडा उशिरा येत असल्यामुळे बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट येत्या 7 दिवसाच्या आत पूर्ण करावे. ज्या बँकांचे पिक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे, त्या बँकांनी त्यामागची कारणे शोधून व त्वरीत सुधारणा करुन पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट पुर्ण करावे. बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील किती शेतकरी सभासदांना पिक कर्ज वाटप केले आहे त्याची स्वतंत्र गावनिहाय यादी तयार करावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पिक कर्ज घेतले नाही त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना पिक कर्ज घेण्यास बँकांनी प्रोत्साहित करावे. तसेच नियमित खातेदार असलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक कर्ज घेतले नाही त्यांच्याशी सुध्दा संपर्क साधून पिक कर्ज घेण्यासाठी बँकेत येण्यास सांगावे असे ते म्हणाले.

             श्री. कोकडवार म्हणाले, बँक शाखांनी पात्र शेतकरी सभासदांना तसेच नविन सभासदांना पिक कर्ज देण्यासाठी कार्यक्षेत्रातील गावांशी संपर्क साधावा. गावाचे सरपंच व सचिव यांना खातेदारांची यादी दयावी. ज्यांनी अद्यापही पिक कर्ज घेतले नाही त्यांना पिक कर्ज घेण्यासाठी ते गावपातळीवर प्रोत्साहित करतील. तसेच ज्यांनी पिक कर्ज घेतले आहे पण नविन पिक कर्ज घेतले नाही त्यांच्याशी सुध्दा ते गावपातळीवर संपर्क साधून त्या शेतकऱ्यांना बँकेकडे पिक कर्जासाठी जाण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करतील असे त्यांनी सांगितले.

             श्री. निनावकर म्हणाले, बँकांना पिक कर्ज वाटपाबाबत दिलेले उदिष्ट वेळीच पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. काही बँकांना भेटी देऊन तातडीने पिक कर्ज वाटप करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी देखील मदत करण्यात येत आहे. निश्चितपणे बँकांना दिलेले उदिष्ट बँक पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आतापर्यंत या खरीप हंगामात बँकांनी केलेल्या पिक कर्ज वाटपाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.   

           सन 2022-23 या वर्षात 14 जून 2022 पर्यंत 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटी 84 लक्ष 82 हजार रुपये खरीप पिक कर्ज वाटप बँकांनी केले आहे. यामध्ये नविन 2335 शेतकऱ्यांना 32 कोटी 67 लक्ष 37 हजार रुपये पिक कर्ज वाटपाचा समावेश आहे. यावर्षी 14 जूनपर्यंत सार्वजनिक बँकांनी 15 हजार 380 शेतकऱ्यांना 154 कोटी 62 लक्ष 98 हजार रुपये, खाजगी बँकांनी 735 शेतकऱ्यांना 13 कोटी 39 लक्ष 36 हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 9 हजार 442 शेतकऱ्यांना 102 कोटी 92 लक्ष 70 हजार रुपये आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 55 हजार 810 शेतकऱ्यांना 458 कोटी 89 लक्ष 78 हजार रुपये पिक कर्ज वाटप केल्याचे श्री. निनावकर यांनी सांगितले.

            यावर्षी 1 लक्ष 8 हजार 750 शेतकऱ्यांना 1150 कोटी रुपये पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत 74.82 टक्के शेतकरी सभासदांना 63.47 टक्के खरीप पिक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक पिक कर्ज वाटप विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 10 हजार 500 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 442 शेतकऱ्यांना 102 कोटी 92 लक्ष 70 हजार रुपये पिक कर्ज वाटप केले आहे. ही टक्केवारी 93.57 इतकी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 65 हजार शेतकऱ्यांपैकी 55 हजार 810 शेतकऱ्यांना 458 कोटी 89 लक्ष 78 हजार रुपये कर्ज वाटप आहे. ही टक्केवारी 69.53 इतकी आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप पिक कर्ज वाटपाचे प्रमाण 74.82 इतकी आहे. तर 63.47 टक्के इतकी रक्कम वाटप केली आहे. या सभेला जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी तसेच विविध बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. संबंधित प्रतिनिधीनी त्यांच्या बँकांमार्फत वाटप करण्यात आलेल्या पिक कर्जाबाबतची माहिती यावेळी दिली.      

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे