धानोरा (खुर्द) येथे अल्पवयीन मुलाचा बालविवाह थांबविला
धानोरा (खुर्द) येथे अल्पवयीन मुलाचा बालविवाह
थांबविला
वाशिम, दि. 10 (जिमाका)
: वाशिम तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथे 10 जून रोजी एका 19 वर्षीय
अल्पवयीन मुलाचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड लाईनच्या
टोल फ्री क्रमांक 1098 वर मिळाली होती. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक
अग्रहरी यांनी बाल संरक्षण कक्षाच्या चमूला तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबविण्याचे
निर्देश दिले.
त्यावरुन तालुका संरक्षण अधिकारी
बी.बी. धनगर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रीय कार्यकर्ता रामा वाळले, चाईल्ड
लाईनचे समुपदेशक अर्चना वानखेडे, केस वर्कर अविनाश चौधरी, गोपीशंकर आरु, अविनाश
सोनुने, शिवांगी गिरी, अनसिंग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ओंकार चव्हाण व गजानन
चौधरी यांनी धानोरा (खुर्द) गाठले. तेथील ग्राम बाल समिती, सरपंच अशोक खडसे,
ग्रामसेविका गंगासागर महाले, अंगणवाडी सेविका सुनिता आढाव, आशा सेविका बेबी मापारी,
तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधव मापारी, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी इंगोले यांच्यासोबत
चर्चा करुन बाल विवाह होत असलेल्या घरी जाऊन वधु/वराचे समुपदेशन करुन बालविवाह
रोखला. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होते. परंतू मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे
नवरदेवाला वेशीवरुन वापस जावे लागले. मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न
करणार असल्याचे हमीपत्र नवरदेवाकडून लिहून घेण्यात आले.
नागरिकांनी बालविवाहाबाबत सतर्क राहावे.
जिल्ह्यात होत असलेल्या बालविवाहासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णत: गोपनिय
ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते
18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरीता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन
क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अलोक अग्रहरी
यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment