रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी षण्मुगराजन एस.


रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी

                                                               षण्मुगराजन एस.

कॅच द रेन मोहिमेचा आढावा

        वाशिम, दि.27 (जिमाका) : भुगर्भातील पाण्याच्या पातळीत नियोजनातून वाढ करण्यासाठी पावसाळयात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब हा भूगर्भात मुरविणे गरजेचे आहे. जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात विविध यंत्रणा, सेवाभावी संस्था तसेच अशासकीय संस्थांनी पावसाळयात पावसाच्या पाण्याचे भूगर्भात संकलन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे तातडीने पुर्ण करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 27 जून रोजी केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेनचा आढावा श्री. षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक श्री. मीणा, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश तांगडे, वाशिम मुख्याधिकारी दिपक मोरे, रिसोड मुख्याधिकारी श्री. गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी निलेश राठोड, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. कडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी, कारंजा गट विकास अधिकारी श्री. श्रृंगारे, मानोरा गट विकास अधिकारी श्री. परिहार, रिसोड गट विकास अधिकारी श्री. सोळंके, उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव व श्री. सपकाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

           श्री. षण्मुगराजन म्हणाले, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायती तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे पावसाळा लक्षात घेता त्वरीत पुर्ण करावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या बाहेरची या उपक्रमांतर्गत करण्यात येणारी कामे जलशक्ती अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. केलेल्या कामाचे जिओ टॅगींग करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामसेवकांची सभा घेवून सर्व इमारतीवरुन रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे निर्धारीत वेळेत पुर्ण करावी. विहिर पुनर्भरण, बोअरवेल दुरुस्तीची कामे आणि वृक्ष लागवडीची कामे 1 जुलैपासून सुरु करावी. असे ते म्हणाले.

           शहरी भागातील शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, शहरी भागात खाजगी इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना त्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करणे बंधनकारक करण्यात यावी. ज्या विभागांनी जलसंधारणाची कामे केली आहे ती सर्व कामे जलशक्ती पोर्टलवर अपलोड करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 50 वृक्षांची या पावसाळयात लागवड करुन त्याचे संगोपन करावे. या मोहिमेतून करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कामाची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी येणार आहेत. कॅच द रेन मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा दर आठवडयाला घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          श्रीमती पंत म्हणाल्या, रोहयोतून शोषखड्डयाची कामे एका आठवडयाच्या आत पूर्ण करण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागाचे तालुका व गावपातळीवरील कार्यालयाच्या इमारतीवरुन पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यात यावे. सर्व शाळांमध्ये सुध्दा मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीची कामे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे हाती घेण्यात यावी. असे त्या म्हणाल्या.

          यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कॅच द रेन या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या, प्रगतीवर असलेल्या तसेच करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.    

                                                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे